Development work in Aditya Thackeray constituency; Shiv Sena reaction to MNS allegations | आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात विकासकामांची पोलखोल; मनसेच्या आरोपांना शिवसेनेचं प्रत्युत्तर

आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात विकासकामांची पोलखोल; मनसेच्या आरोपांना शिवसेनेचं प्रत्युत्तर

ठळक मुद्देप्रेमनगर रहिवाशी भागात सार्वजिनक शौचालयाची दुरावस्था गेल्या काही महिन्यापासून सुरू आहेशौचालयाच्या दुरुस्तीचा शुभारंभ करत नारळ वाढवला, मात्र गेल्या २ महिन्यापासून याठिकाणी प्रत्यक्षात कोणत्याही कामाला सुरुवात नाहीकाही लोकांना हाताशी धरून मनसे विकासकामांमध्ये राजकारण करण्याचं काम करत आहे.

मुंबई – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांच्या वरळी मतदारसंघात शिवसेना-मनसे आमनेसामने आल्याचं पाहायला मिळत आहे, स्थानिक शिवसेना नगरसेवक आशिष चेंबुरकर यांच्या प्रेमनगर भागातील एका विकासकामाच्या मुद्द्यावरून मनसेने शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे, तर केवळ राजकारणासाठी मनसे खोटेनाटे आरोप करत असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे.(MNS Target Shivsena in Aditya Thackeray Worli Assembly Constituency)

प्रेमनगर रहिवाशी भागात सार्वजिनक शौचालयाची दुरावस्था गेल्या काही महिन्यापासून सुरू आहे, याठिकाणी मागच्यावेळी येऊन आम्ही येथील नागरिकांचे हाल फेसबुकद्वारे मांडले त्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी याची तात्काळ दखल घेऊन प्रेमनगर भागात शौचालयाच्या दुरुस्तीचा शुभारंभ करत नारळ वाढवला, मात्र गेल्या २ महिन्यापासून याठिकाणी प्रत्यक्षात कोणत्याही कामाला सुरुवात नाही, लोकांना आजही त्याच परिस्थितीचा सामना करावा लागत आहे, शौचालयांना दरवाजे, लाईट नाही, लोकांच्या तक्रारीकडे स्थानिक प्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मनसेचे विभागाध्यक्ष संतोष धुरी यांनी केला, याबाबत त्यांनी फेसबुक लाईव्ह करत ही समस्या मांडली.

मात्र मनसेने केलेले सगळे आरोप शिवसेना नगरसेवक आशिष चेंबुरकर यांनी फेटाळून लावले आहेत. प्रेमनगर भागात शौचालयाच्या दुरुस्ती कामाचं ई टेंडर काढण्यात आलं होतं, त्याला निधी मंजूर झाला, परंतु त्यानंतर येथील स्थानिक रहिवाशांनी शौचालयाच्या दुरुस्तीऐवजी नव्याने शौचालय उभारणी करावी असं पत्र दिले, स्थानिक रहिवाशांनी केलेल्या मागणीनुसार याठिकाणी नव्याने शौचालय बांधण्यासाठी पुन्हा ई-टेंडरिंगच्या प्रक्रियेतून जावं लागत आहे, त्यामुळे हा विलंब झाला असून लवकरच या कामाला गती येईल, परंतु काही लोकांना हाताशी धरून मनसे विकासकामांमध्ये राजकारण करण्याचं काम करत आहे. खोटेनाटे आरोप लावून आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करते, हे योग्य नाही, याठिकाणी कामं कोणं करतं हे जनतेला माहिती आहे, केवळ फेसबुकद्वारे लाईव्ह करून शिवसेनेवर आरोप करण्याचं काम मनसेने बंद करावं असा टोला शिवसेना नगरसेवक आशिष चेंबुरकर यांनी मनसेला लगावला आहे. तसेच संतोष धुरी स्वत: नगरसेवक होते त्यांना महापालिकेच्या कामाची पुरेपूर माहिती आहे, परंतु राजकारणासाठी संतोष धुरी स्टंटबाजी करतात असा आरोपही शिवसेनेने केला आहे.

 

Web Title: Development work in Aditya Thackeray constituency; Shiv Sena reaction to MNS allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.