दलित, मुस्लिम, आदिवासी हे अनेक भारतीयांच्या खिजगणतीत नाहीत - राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2020 06:53 IST2020-10-12T01:35:53+5:302020-10-12T06:53:47+5:30
Rahul Gandhi, Yodi Adityanath News: आदित्यनाथ सरकारवर केली टीका

दलित, मुस्लिम, आदिवासी हे अनेक भारतीयांच्या खिजगणतीत नाहीत - राहुल गांधी
नवी दिल्ली : भारतीयांपैकी अनेक जण दलित, मुस्लिम, आदिवासी यांना खिजगणतीत धरत नाहीत. त्यांना माणूस म्हणून नीट वागणूक देत नाहीत, असे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले. त्यामुळेच हाथरसमध्ये कोणावरही बलात्कार झालेला नाही, असे विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व पोलीस करू शकतात, अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली.
गांधी म्हणाले, ‘हाथरसमध्ये बलात्कार झालेल्या दलित मुलीला योगी आदित्यनाथ किंवा पोलीस, तसेच अनेक भारतीय नागरिकांच्या लेखी काडीचेही महत्त्व नाही. त्यामुळे ते तिच्यावर झालेल्या अत्याचाराची दखल घेत नाहीत. दलित, मुस्लिम, आदिवासींना माणूस म्हणून चांगली वागणूक मिळत नाही, ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे.’ दलित मुलीवर बलात्कार झाला, असे नमूद करणाऱ्या बातम्या वारंवार छापून येत आहेत. तशा बातम्यांचा हवाला राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटसोबत दिला.
पीडितेच्या कुटुंबाला हवा न्याय
आम्हाला कोणतीही भरपाई नको, फक्त न्याय हवा, अशी मागणी हाथरसमधील दलित मुलीच्या कुटुंबियांनी राहुल व प्रियांका गांधी यांच्याकडे केली होती. दलित मुलीच्या कुटुंबियांना भेटण्यापासून राहुल व प्रियांका गांधी यांना एकदा उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवून त्यांना दिल्लीला परत पाठविले होते. त्यानंतर काही दिवसांनी त्यांना हाथरसला जाऊन दलित मुलीच्या कुटुंबियांना भेटण्याची परवानगी देण्यात आली होती.