Crisis on NDA government in Bihar ?; Lalu Prasad Yadav calls MLAs from jail, Sushil Modi allegations | बिहारमध्ये NDA सरकारवर संकट?; जेलमधून लालू प्रसाद यादवांचा आमदारांना फोन, मोदींचा गंभीर आरोप

बिहारमध्ये NDA सरकारवर संकट?; जेलमधून लालू प्रसाद यादवांचा आमदारांना फोन, मोदींचा गंभीर आरोप

ठळक मुद्देरांचीमधून लालू प्रसाद यादव एनडीएच्या आमदारांना फोन करत आहेत, या आमदारांना महाआघाडीत येण्यासाठी गळ घालत आहेतइतकचं नाही तर लालूंनी अनेक नेत्यांना मंत्रिपद देण्याचं आमिषदेखील दाखवलं हळूहळू निकाल बदलले आणि महाआघाडीला मागे टाकत एनडीएने बिहारमध्ये बहुमत मिळवलं

पटणा – बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल आले, त्याठिकाणी जेडीयू आणि भाजपाचं सरकार स्थापन झालं, परंतु अवघ्या काही दिवसांतच एनडीएच्या सरकारवर संकट येण्याची चिन्हे दिसत आहेत. बिहारमध्ये भाजपाला ७४ जागा मिळाल्या तर जेडीयूला ४३ जागा मिळाल्या आहेत, एनडीएला बिहारमध्ये काठावरचं बहुमत असल्याने आगामी काळात सरकार कोसळण्याचं संकट कायम आहे.

यातच बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी आरजेडीचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यावर मोठा आरोप लावला आहे. लालू प्रसाद यादव एनडीएच्या आमदारांना फोन करून त्यांना महाआघाडीत सहभागी होण्यासाठी लालच देत असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. याबाबत सुशील मोदींनी ट्विटमध्ये लिहिलंय की, रांचीमधून लालू प्रसाद यादव एनडीएच्या आमदारांना फोन करत आहेत, या आमदारांना महाआघाडीत येण्यासाठी गळ घालत आहेत. इतकचं नाही तर लालूंनी अनेक नेत्यांना मंत्रिपद देण्याचं आमिषदेखील दाखवलं असल्याचं त्यांनी सांगितले.

सुशील कुमार मोदींनी या ट्विटमध्ये एक नंबरही जारी केला आहे. माहिती मिळाल्यानंतर मी लालू प्रसाद यादव यांना 8051216302 या नंबरवर कॉल केला, त्यांनी फोन उचलला. तुम्ही करताय ते बेकायदेशीर आणि चुकीच्या पद्धतीने करत आहात, यात अयशस्वी व्हाल असं मोदींनी लालू प्रसाद यादव यांना सांगितलं.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये सुरुवातीला महाआघाडीचं सरकार बनेल अशी खात्री वाटत होती, मात्र हळूहळू निकाल बदलले आणि महाआघाडीला मागे टाकत एनडीएने बिहारमध्ये बहुमत मिळवलं, एनडीएला १२५ तर महाआघाडीला ११० जागा मिळाल्या, यावेळी महाआघाडीने राज्यात सरकार बनवणार असल्याचं अनेकदा सांगितले.

आम्ही हरलो नाही, आम्हाला हरवलं गेलं

बिहार निवडणूक निकालानंतर तेजस्वी यादव यांनी बिहारमधील जनतेचे आभार मानले होते, तसेच बिहारची जनता आमच्या सोबत असल्याचं म्हटलं आहे. आम्ही हरलो नसून आम्हाला हरवलं गेलं आहे असं देखील तेजस्वी यांनी म्हटलं होतं. यासोबतच त्यांनी पोस्टल बॅलेट पुन्हा एकदा मोजण्यात यावीत अशी मागणी केली होती. "जनादेश महाआघाडीसोबत होता, मात्र निवडणूक आयोगाचा निकाल एनडीच्या पक्षात होता. हे पहिल्यांदाच घडलेलं नाही. २०१५ मध्ये महाआघाडी स्थापन झाल्यानंतर मते आमच्या बाजूने होती, मात्र भाजपाने सत्ता हस्तगत करण्यासाठी मागच्या दाराने प्रवेश केला" असं देखील तेजस्वी यादव यांनी म्हटलं होतं. उमेदवाराच्या मनातील संशय दूर करणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. तेव्हा पुन्हा मतं मोजणं अत्यंत आवश्यक असल्याचं देखील ते म्हणाले. या बरोबरच आम्हाला रेकॉर्डिंग दाखवणेही आवश्यक आहे असंही तेजस्वी यादव यांनी सांगितले होते.

Web Title: Crisis on NDA government in Bihar ?; Lalu Prasad Yadav calls MLAs from jail, Sushil Modi allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.