पंतप्रधानांचा एकच कायदा, देश फुंकून मित्रांचा फायदा; राहुल गांधींचा मोदी सरकारला टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2021 18:45 IST2021-03-14T18:43:16+5:302021-03-14T18:45:28+5:30
Rahul Gandhi : पेट्रोल-डिझेल आणि खासगीकरणावरून राहुल गांधींनी साधला पंतप्रधानांवर निशाणा

पंतप्रधानांचा एकच कायदा, देश फुंकून मित्रांचा फायदा; राहुल गांधींचा मोदी सरकारला टोला
काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी रविवारी पुन्हा एकदा मोदी सरकारवरपेट्रोल-डिझेलचे दर, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची कथितरित्या विक्री आणि एलपीजी सिलिंडरच्या वाढत्या दरांवरून निशाणा साधला. तसंच यावेळी केंद्र सरकारकडून दिवसा लूट केली जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
"केंद्र सरकारची दोन्ही हातांनी दिवसा लूट. गॅस-डिझेल-पेट्रोलवर जबरदस्त कर वसूली आणि मित्रांना पीएसयू-पीएसबी विकून जनतेकडून हिस्सा, रोजगार आणि सुविधा हिरावून घेणं. पंतप्रधानांचा एकच कायदा, देश फुंकून मित्रांचा फायदा," असं म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधानांवर टीका केली.
केंद्र सरकार की दोनों हाथों से दिनदहाड़े लूट-
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 14, 2021
1. गैस-डीज़ल-पेट्रोल पर ज़बरदस्त टैक्स वसूली।
2. मित्रों को PSU-PSB बेचकर जनता से हिस्सेदारी, रोज़गार व सुविधाएँ छीनना।
PM का एक ही क़ायदा,
देश फूँककर मित्रों का फ़ायदा।
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींवर काँग्रेसकडून सातत्यानं सरकारवर टीका केली जात आहे. सरकारनं २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर पेट्रोलियम उत्पादनांवर कर लावून २१ लाख कोटी रूपयांपेक्षा अधिक महसूल गोळा केला असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात येतआहे. दरम्यान, संसदेतही काँग्रेसनं यावरून गदारोळ केला होता. तसंच यावर चर्चेची मागणीही केली होती. २०२१ या वर्षाच्या सुरूवातीच्या दोन महिन्यांमध्ये पेट्रोलच्या दरात ४.८७ रूपये प्रति लिटर आणि डिझेलच्या दरात ४.९९ रूपये प्रति लिटर वाढ करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील अनुपपूर आणि राजस्थानमधील श्री गंगानगर या ठिकाणी इंधनाच्या दरानं शंभरी पार केली आहे. तर दुसरीकडे एलपीजी सिलिंडरच्या दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून सामान्यांच्या खिशावर याचा ताण पडत आहे.