काँग्रेसने निवडला गुलाम नबी आझाद यांचा उत्तराधिकारी, आता या नेत्याकडे राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी
By बाळकृष्ण परब | Updated: February 12, 2021 12:03 IST2021-02-12T11:59:40+5:302021-02-12T12:03:27+5:30
Congress News : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचा राज्यसभेतील कार्यकाळ संपुष्टात येत आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेतील विरोधीपक्ष नेतेपदी आझाद यांच्या उत्तराधिकाऱ्याची निवड केली आहे.

काँग्रेसने निवडला गुलाम नबी आझाद यांचा उत्तराधिकारी, आता या नेत्याकडे राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी
नवी दिल्ली - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचा राज्यसभेतील कार्यकाळ संपुष्टात येत आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेतील विरोधीपक्ष नेतेपदी आझाद यांच्या उत्तराधिकाऱ्याची निवड केली आहे. आझाद यांचा कार्यकाळ संपल्यानंतर काँग्रेसने पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी निवड केली आहे. ( Mallikarjun Kharge is New Leader of Opposition in Rajya Sabha)
काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस वेणुगोपाल यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, काँग्रेसने (Congress) राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना नव्या विरोधीपक्षनेत्याबाबतची माहिती दिली आहे. आझाद हे कार्यमुक्त झाल्यानंतर आता मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांचे नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी नामांकित करण्यात आले आहे. त्यामुळे मल्लिकार्जुन खर्गे हे राज्यसभेमधील पुढील विरोधीपक्षनेते असतील.
काँग्रेसचे कर्नाटकमधील नेते अलेल्या मल्लिकार्जुन खर्गे यांना राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जाते. त्यामुळे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही त्यांना राज्यसभेचे सदस्यत्व देण्यात आले होते. खर्गे यांनी यापूर्वी लोकसभेमध्येही पक्षाचे नेते म्हणून काम पाहिले होते.
दरम्यान, राज्यसभेमध्ये १५ फेब्रुवारीनंतर जम्मू काश्मीरमधील कुठलाही प्रतिनिधी नसेल. सध्या येथून राज्यसभेवर चार सदस्य आहेत. मात्र कलम ३७० हटवून जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिल्यापासून येथे निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे सद्यस्थितीत तिथून राज्यसभेवर नवा सदस्य निवडून येणार नाही. पीडीपीचे खासदार नझीर अहमद लावे (१० फेब्रुवारी) आणि मीर मोहम्मद फैयाज (१५ फेब्रुवारी) यांचा कार्यकाळ समाप्त होणार आहे. तर गुलाम नबी आझाद यांचा कार्यकाळ (१५ फेब्रुवारी) आणि भाजपाचे खासदार शमशेर सिंह मन्हास यांचा कार्यकाळ १० फेब्रुवारीला संपत आहे.