bjp mp udayanraje bhosale indirectly attacks ncp chief sharad pawar over maratha reservation | अजून किती दिवस तुम्हाला मराठा स्ट्राँग मॅन उपमा द्यायची?; उदयराजेंचा पवारांवर वार

अजून किती दिवस तुम्हाला मराठा स्ट्राँग मॅन उपमा द्यायची?; उदयराजेंचा पवारांवर वार

सातारा: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून भारतीय जनता पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. वर्षानुवर्षे मराठा समाजावर अन्याय होत आहे. त्यामुळे इतकी वर्षे सत्तेत असलेल्यांनी मराठा समाजाच्या प्रश्नांना उत्तरं द्यावीत. अजून किती दिवस मराठा समाजाचा अंत पाहणार, असा सवाल भोसले यांनी उपस्थित केला. ते साताऱ्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. 

मराठा आरक्षण प्रश्नावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उदयनराजेंनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर निशाणा साधला. 'मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे गेली अनेक वर्षे सत्तेत असलेले या प्रश्नाला जबाबदार आहेत. मराठा समाजावर अन्याय करणाऱ्यांनी आता समाजाच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत. देवेंद्र फडणवीसांनी सत्तेत असताना आरक्षणाचा मुद्दा रेटून नेला. मग तुम्हाला का जमत नाही?,' असा सवाल उदयनराजेंनी उपस्थित केला.

मराठा आरक्षणाचा विषय काहींना अगदी व्यवस्थितपणे माहीत आहे. पण किती दिवस मराठ्यांचे कैवारी, मराठा स्ट्राँग मॅन उपमा किती दिवस द्यायची?, असा प्रश्न उपस्थित करत उदयनराजेंनी शरद पवारांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. तुम्ही शरद पवारांची भेट घेऊन चर्चा करणार का, असा प्रश्न यावेळी उदयनराजेंना विचारण्यात आला. त्यावर नुसती चर्चा करून काय उपयोग? तोडगा निघणार असेल, तर चर्चा करण्यात अर्थ आहे, असं उत्तर उदयनराजेंनी दिलं.

गेल्या अनेक वर्षांपासून सत्तेत असलेले नेते आजही सत्तेत आहेत. त्यांनी मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावावा. मराठा समाजामध्ये मोठी नाराजी आहे. सध्या कोरोनाचं संकट आहे. अन्यथा मराठा समाज सरकारमधील नेत्यांना घराबाहेर पडू देणार नाही, अशा इशारा त्यांनी दिला. प्रत्येक निवडणुकीत आरक्षणाचं आश्वासन दिलं जातं. पण प्रश्न मार्गी लागत नाही. राज्यात मराठा ही निर्णायक जात आहे. विश्वासघात झाल्यास सरकारला जनताच खाली खेचेल. ऍक्शनला रिऍक्शनला मिळाल्यास जबाबदारी सरकारची असे, अशी आक्रमक भूमिका उदयनराजेंनी घेतली.
 

Web Title: bjp mp udayanraje bhosale indirectly attacks ncp chief sharad pawar over maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.