BJP 'Mission Mumbai' to target Shiv Sena in BMC Election, Today will be the strategy decided | शिवसेनेच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी भाजपाचं ‘मिशन मुंबई’; आज रणनीती ठरणार

शिवसेनेच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी भाजपाचं ‘मिशन मुंबई’; आज रणनीती ठरणार

ठळक मुद्देमुंबईत आज भाजपाच्या कार्यकारणीची बैठकबैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मार्गदर्शन करणारमुंबईत अनेक वर्षापासून महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे त्यामुळे ही सत्ता काबीज करण्यासाठी भाजपा प्रयत्नशील

मुंबई – बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. बिहार निकालाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले, भाजपाच्या यशामागे देवेंद्र फडणवीस यांची उत्तम रणनीती असल्याचं कौतुक भाजपा नेते करत आहेत, तर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाचं कौतुक महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. बिहारच्या निकालानंतर आता राज्यातील भाजपा नेत्यांनी आगामी महापालिका निवडणुकांकडे लक्ष केंद्रीत केलं आहे.

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी भाजपानं मिशन मुंबई हाती घेतलं आहे. मुंबईत आज भाजपाच्या कार्यकारणीची बैठक आहे. या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मार्गदर्शन करणार आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या या बैठकीला महत्त्व प्राप्त झालं आहे. मुंबईत अनेक वर्षापासून महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे त्यामुळे ही सत्ता काबीज करण्यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे.

मुंबईतील भाजपाची संघटनात्मक बांधणी आणि निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत मुंबईतील भाजपा नगरसेवक, पदाधिकारी, आमदार आणि खासदार उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत शिवसेनेला कोडींत पकडण्यासाठी भाजपा रणनीती आखणार आहेत.

मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेची वर्षानुवर्ष सत्ता आहे. अनेक वर्ष पालिकेत शिवसेना-भाजपा युतीची सत्ता होती, मात्र गेल्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवली, या निवडणुकीत शिवसेना-भाजपात अटीतटीची लढत पाहायला मिळाली. शिवसेनेचे ९२ तर भाजपाचे ८२ नगरसेवक निवडून आले होते, मात्र राज्यातील सत्तेत एकत्र असल्याने भाजपाने मुंबईत महापौर बसवण्याचा प्रयत्न केला नाही. त्यावेळी भाजपा पहारेदाराची भूमिका निभावेल असं सांगण्यात आलं.

मुंबई महापालिकेत काँग्रेसचा विरोधी पक्षनेता आहे. भाजपाने शिवसेनेला ना विरोध ना पाठिंबा अशाप्रकारे भूमिका घेतली होती. त्यामुळे ८२ नगरसेवकांचे संख्याबळ असतानाही विरोधी पक्षनेतेपदावरही भाजपाने दावा केला नाही. परंतु आता चित्र बदललं आहे. राज्यात मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना-भाजपात बिनसलं, विधानसभा निवडणूक शिवसेना-भाजपाने एकत्र लढवली, त्यात भाजपाला १०५ आणि शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या. मात्र निकालानंतर शिवसेनेने भाजपाची साथ सोडत काँग्रेस-राष्ट्रवादीशी घरोबा केला, राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान झाला आणि इतक्या जागा जिंकूनही भाजपाला विरोधी बाकांवर बसावं लागलं. त्यामुळे शिवसेनेचा हा वार भाजपाच्या जिव्हारी लागला. त्यामुळे आता भाजपाने मुंबई महापालिकेवर झेंडा रोवण्याचं निश्चित केलं आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणूक शिवसेनेसाठी आव्हानात्मक असणार आहे.

मुंबई महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादी अन् मनसेची भूमिका निर्णायक

राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचं सरकार आहे. मात्र मुंबई महापालिकेत काँग्रेसचा विरोधी पक्षनेता आहे. मुंबईत राष्ट्रवादीची इतकी ताकद नसल्याने शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात परंतु काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष असेल. मागील निवडणुकांमध्ये भाजपाने स्वबळावर ८२ नगरसेवक निवडून आणले होते, त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांनी एकत्र निवडणूक लढवली तर भाजपासमोर मोठं आव्हान असणार आहे. पण त्याचदरम्यान मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. मनसेने २०१२ च्या निवडणुकीत २७ नगरसेवक निवडून आणले होते, परंतु मागच्या निवडणुकीत अवघे ७ नगरसेवक मनसेचे निवडून आले, या ७ पैकी ६ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने मनसे यंदाच्या निवडणुकीत स्वबळावर लढणार की भाजपासोबत आघाडी होणार हे पाहणंही गरजेचे आहे.  

Web Title: BJP 'Mission Mumbai' to target Shiv Sena in BMC Election, Today will be the strategy decided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.