...तेव्हा आम्ही राज्यात सरकार देऊ; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली 'वेळ'

By कुणाल गवाणकर | Published: November 11, 2020 06:49 PM2020-11-11T18:49:45+5:302020-11-11T18:50:55+5:30

बिहारमधील विजयात पंतप्रधान मोदींचा मोलाचा वाटा; फडणवीस यांच्याकडून पंतप्रधानांचं कौतुक

bjp leader devendra fadnavis reaction on forming government in maharashtra | ...तेव्हा आम्ही राज्यात सरकार देऊ; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली 'वेळ'

...तेव्हा आम्ही राज्यात सरकार देऊ; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली 'वेळ'

Next

मुंबई: बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठं यश मिळालं आहे. अतिशय चुरशीच्या लढतीनंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं (एनडीए) बिहारमध्ये सत्ता राखण्यात यश मिळवलं आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलापेक्षा (जेडीयू) अधिक जागा जिंकत भाजप बिहारमध्ये मोठा भाऊ ठरला आहे. या निवडणुकीत भाजपनं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर प्रभारीपदाची जबाबदारी दिली होती. त्यात फडणवीस यशस्वी ठरले. या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर भाष्य केलं.

राज्यातलं महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याचे दावे भाजप नेत्यांकडून अनेकदा केले जातात. बिहारमधील विजयानंतर आता महाराष्ट्रातही भाजपचं सरकार येईल, असं ट्विट कालच भाजप आमदार नितेश राणेंनी केलं. मात्र फडणवीस यांनी राज्यातल्या सत्तापरिवर्तनाबद्दल वेगळी भूमिका मांडली. 'आम्ही राज्यातल्या सत्तांतराकडे लक्ष ठेवून काम करत नाही. राज्यातलं सरकार एके दिवशी स्वत:च्याच ओझ्यामुळे कोलमडून पडेल.कारण अशी सरकारं फार काळ चालत नाहीत. ज्या दिवशी हे सरकार कोसळेल, त्या दिवशी आम्ही पर्यायी सरकार देऊ,' असं फडणवीस म्हणाले.




बिहारमधील राजकीय परिस्थितीवरही फडणवीस यांनी भाष्य केलं. प्रत्येक निवडणूक वेगळी असते आणि प्रत्येक निवडणूक तुम्हाला काहीतरी शिकवून जात असते. बिहारमधील मतदार अतिशय प्रगल्भ आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास दाखवला. कोरोना संकट काळात काही सरकारं केवळ टीका करत होती. त्यावेळी मोदींनी विविध योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना मदतीचा हात दिला, असं फडणवीस यांनी सांगितलं.

बिहारमध्ये भाजपला मित्रपक्ष असलेल्या जेडीयूपेक्षा अधिक जागा मिळाल्या असल्यानं मुख्यमंत्रिपद भाजपला मिळावं, अशी मागणी जोर धरू लागली आहे. भाजपमधील काही वरिष्ठ नेत्यांनीच याबद्दल विधानं केली आहेत. त्यावर फडणवीस यांनी आम्ही दिलेला शब्द पाळतो, असं म्हणत शिवसेनेला टोला लगावला. नितीश कुमारच मुख्यमंत्री होतील, हे पंतप्रधान मोदींपासून अनेक नेत्यांनी सांगितलं आहे. तसा शब्दच आम्ही त्यांना दिलेला आहे. तो शब्द आम्ही पाळणारच, असं फडणवीस म्हणाले.

 

Web Title: bjp leader devendra fadnavis reaction on forming government in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.