काँग्रेसपेक्षा अधिक जागांवर भाजप रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 03:42 AM2019-04-25T03:42:30+5:302019-04-25T03:42:51+5:30

एकाचे मित्र तुटले, तर दुसऱ्याचे वाढले

BJP has more seats than Congress | काँग्रेसपेक्षा अधिक जागांवर भाजप रिंगणात

काँग्रेसपेक्षा अधिक जागांवर भाजप रिंगणात

Next

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच भाजप काँग्रेसपेक्षा जास्त जागा लढत आहे. भाजपने आतापर्यंत ४३७ तर काँग्रेसने ४२३ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. उत्तर प्रदेशातल्या काही जागांवरील आपल्या उमेदवारांची नावे या दोन्ही पक्षांनी जाहीर करणे अद्यापी बाकी आहे.

सन २०१४च्या लोकसभा निवडणुकांत भाजपला मोठा विजय मिळाला तर काँग्रेसला फक्त ४४ जागा जिंकता आल्या. भाजपची मोठी उमेदवार यादी ही त्या पक्षाने गेल्या पाच वर्षांत केलेल्या विस्ताराचे निदर्शक आहे. भाजपने विविध पक्षांशी युती केली असली तरी जागावाटपात भाजपचाच वरचष्मा राहिला आहे.

काँग्रेसनेही काही पक्षांशी आघाडी केली असली तरी भाजपच्या तुलनेत काँग्रेसने कमी संख्येने उमेदवार उभे केले आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकांत झालेला हा बदल ऐतिहासिक असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून काँग्रेसची पाळेमुळे या देशात रुजली आहेत, तर भारतीय जनसंघ हे भाजपचे मूळ आहे. भारतीय जनसंघाला जनतेचा व्यापक पाठिंबा कधीच मिळाला नव्हता.

दोघांचे म्हणणे
काँग्रेसच्या माहिती विश्लेषण विभागाचे प्रमुख प्रवीण चक्रवर्ती म्हणाले की, भाजप काँग्रेसपेक्षा अधिक जागा लढवत आहे पण भाजपपासून अनेक मित्रपक्ष दुरावले आहेत तर काँग्रेसने अनेक मित्रपक्ष जोडले आहेत.
भाजपचे प्रवक्ते जीएलव्ही नरसिंहराव यांनी सांगितले की, सदस्यसंख्या, मतदारांचा पाठिंबा, विविध राज्यांत असलेली सरकारे या सर्वच गोष्टींत भाजप काँग्रेसपेक्षा आघाडीवर आहे. काँग्रेसला पुरेसा जनाधार नसताना तो पक्ष आपल्या क्षमतेपेक्षा जास्त जागा लढवत आहे. त्यामुळे काँग्रेस पराभूत होण्याची शक्यता आहे.

Web Title: BJP has more seats than Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.