BJP Chandrakant Patil target CM Uddhav Thackeray; Sharad Pawar falls out of the house, but ... | चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला; "शरद पवार घराबाहेर पडतात, पण..."

चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला; "शरद पवार घराबाहेर पडतात, पण..."

ठळक मुद्देमी इथं खुर्चीत बसतो, तुम्ही राज्य सांभाळण्याचं कंत्राट घ्या असं उद्धव ठाकरे शरद पवारांना म्हणाले असतीलमंदिरे बंद असल्याने कर्मचाऱ्यांचे पगार रखडले, देवस्थानाकडून सुरु असणारे सामाजिक कामे थांबलीशरद पवार राज्य चालवतायेत, उद्धव ठाकरे ना कधी प्रवास करत, ना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे प्रश्न सोडवतात

सांगली – पक्ष वाढवण्यासाठी भगवा एकहाती फडकवा असं बोलणं गैर नाही, सगळेच आपापला पक्ष वाढवत असतात. पण आम्ही प्रत्यक्षात ती कृती करून दाखवतो अशा शब्दात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. तसेच उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाही, शरद पवार घराबाहेर पडतात असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहे.

पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील म्हणाले की, शरद पवार राज्य चालवतायेत, उद्धव ठाकरे ना कधी प्रवास करत, ना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे प्रश्न सोडवतात, मंदिरे बंद असल्याने कर्मचाऱ्यांचे पगार रखडले, देवस्थानाकडून सुरु असणारे सामाजिक कामे थांबली, शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस लोकांना बाहेर दिसतात, म्हणून कदाचित राज्यपालांनी राज ठाकरेंना शरद पवारांना भेटण्याचा सल्ला दिला असावा असा चिमटा त्यांनी उद्धव ठाकरेंना काढला.

तसेच ही वस्तूस्थिती आहे की, मी इथं खुर्चीत बसतो, तुम्ही राज्य सांभाळण्याचं कंत्राट घ्या असं उद्धव ठाकरे शरद पवारांना म्हणाले असतील, तसा त्यांच्यात करार झाला असावा असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. त्याचसोबत राज ठाकरेंनी राज्य सरकारवर केलेल्या टीकेवर पाटील यांनी उत्तर दिलं, राज ठाकरे खूपच स्पष्ट शब्दात बोलतात असं सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

काय म्हणालेहोते राज ठाकरे?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली, त्यानंतर माध्यमांशी राज ठाकरेंनी संवाद साधला, त्यावेळी ते म्हणाले, प्रश्न खूप आहेत, पण त्याबाबत काही तरी निर्णय घेणं गरजेचं आहे, एक दोन दिवसात वाढीव वीजबिल आणि दूधदराबाबत सरकारने निर्णय घ्यावा, पण सरकारचे आणि राज्यपालांचे एकूण सगळं बघता, तो निर्णय होईल का याबाबत साशंकता आहे. वीजबिलाचा विषय मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलन करतायेत. वीजबिल कमी करू शकतो असं कंपन्यांचे म्हणणं आहे पण राज्य सरकारकडून यावर निर्णय होत नाही. राज्य सरकारने तात्काळ वीजबिलासंदर्भात निर्णय घ्यायला हवा. कोणतीही गोष्ट सांगितली तर त्यावर काम सुरु आहे असं उत्तर मिळतं पण निर्णय होत नाही, लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले, वीजबिल भरमसाठ येत आहेत, लोक बिल कुठून भरणार? बिल नाही भरलं तर वीज कापणार त्यामुळे सरकारने यावर लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे.

दरम्यान, रेल्वे सुरु होत नाही, ११ वीचे प्रवेश रखडले, रस्त्यावर सगळीकडे वाहतूक कोंडी दिसतेय, लोकल सुरु नाही, हॉटेल सुरु झाले मंदिरे सुरु झाली नाही, सरकारने या सर्व गोष्टींचा एकदा खुलासा करणं गरजेचे आहे. प्रश्नांची कमतरता नाही पण निर्णयाची कमतरता आहे, कुंथत कुंथत सरकार चालवता येत नाही, कधी काय सुरु होणार हे सरकारने एकदा सांगावे अशा शब्दात राज ठाकरेंनी राज्य सरकारला फटकारलं आहे. दरम्यान राज ठाकरेंना यावेळी राज्यपालांनी शरद पवारांची भेट घेण्याचा सल्ला दिला त्यावरुन चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

Web Title: BJP Chandrakant Patil target CM Uddhav Thackeray; Sharad Pawar falls out of the house, but ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.