"केंद्र सरकार निर्दयी आणि पाषाणहृदयी, त्यांना अन्नदात्या बळीराजाचे अश्रूही दिसत नाहीत"

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 01:11 PM2021-02-10T13:11:34+5:302021-02-10T13:14:28+5:30

Aslam Sheikh Criticize Central Government : एका बाजूला समाजात सांप्रदायिकतेचं विष पेरायचं आणि दुसरीकडे देश विकायला काढायचा. मोदी सरकारचा खरा चेहरा आता जनतेसमोर आला आहे.

Aslam Sheikh Criticize Central Government in Malad-Malvani Congress Rally | "केंद्र सरकार निर्दयी आणि पाषाणहृदयी, त्यांना अन्नदात्या बळीराजाचे अश्रूही दिसत नाहीत"

"केंद्र सरकार निर्दयी आणि पाषाणहृदयी, त्यांना अन्नदात्या बळीराजाचे अश्रूही दिसत नाहीत"

Next

मुंबई - एका बाजूला समाजात सांप्रदायिकतेचं विष पेरायचं आणि दुसरीकडे देश विकायला काढायचा. मोदी सरकारचा खरा चेहरा आता जनतेसमोर आला आहे. दिल्लीत आंदोलन करणाऱ्या अन्नदात्या बळीराजाचे अश्रूही दिसू नयेत, एवढं निर्दयी व पाषाणहृदयी केंद्र सरकार आहे.काल सायंकाळी रॅलीमध्ये मालाड-मालवणीच्या नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. मोदी सरकारचा अस्त आता समीप आला आहे, असा घणाघात मुंबई शहरचे पालकमंत्री व काॅंग्रेस नेते अस्लम शेख यांनी मोदी सरकारवर केला आहे. काल सायंकाळी  इंधन दरवाढी विरोधात मालाड-मालवणी येथे आयोजित भव्य पदयात्रेनंतरच्या सभेत ते बोलत होते. 

दिवसागणिक वाढत चाललेली महागाई, पेट्रोल डिझेलचे गगनाला भीडणारे भाव, अतिदक्षता विभागात दाखल झालेला जीडीपी, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे कृषी कायद्याबाबत जाब विचारण्यासाठी काॅंग्रेस मालाड (प.) विधानसभा क्षेत्राच्यावतीने मंगळवारी पदयात्रा व सभेचे आयोजन करण्यात आले होते.  मालवणी-अंबोजवाडी येथे या पदयात्रेचे रुपांतर मोठ्या सभेत झाले. 

यावेळी अस्लम शेख व मुंबई काॅंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप  यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर जोरदार हल्ला चढवला. काॅंग्रेसचे हजारो कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांनी या रॅलीमध्ये सहभागी होत मोदी सरकार विरोधातल्या घोषणांनी आसमंत दणाणून सोडला होता. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटीश सत्तेविरोधात निकराचा लढा काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी दिला होता. आज त्याच प्रकारचा संघर्ष काॅंग्रेस कार्यकर्त्यांकडून अभिप्रेत आहे, असे आवाहन शेख यांनी भाषणाच्या शेवटी काॅंग्रेस कार्यकर्त्यांना केले. 

काॅंग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी आपल्या भाषणात शेतकरी आंदोलनावर भाष्य करताना काळ्या मातीतून हिरवं सोनं पिकविणारा शेतकरी मोदी सरकारला त्याच मातीत गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे सांगत देशाला सांप्रदायिक शक्तींपासून काॅंग्रेसचे धर्मनिरपेक्ष विचारच वाचवू शकतात असे प्रतिपादन केले.

याप्रसंगी मुंबई काॅंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, काॅंग्रेसचे प्रवक्ता अरुण सावंत, काॅंग्रेसचे युवा नेते हैदर शेख, नगरसेविका कमरजहाॅं सिद्दकी, नगरसेवक विरेंद्र चौधरी, डाॅ. नॅक्सन नाटके, धनाजी कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.

 मंगलप्रभात लोढा यांचा घेतला समाचार 
अस्लम शेख यांनी भाषणात  भाजपाचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांचा समाचार घेतला. काही दिवसांपूर्वी भाजपाचे मुंबई अध्यक्ष लोढा यांनी मालवणी परिसराचा दौरा करुन मालवणीत  हिंदू व दलितांवरती अत्याचार होत आहेत असं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानाचा समाचार घेताना ते म्हणाले की,  सर्व जाती-धर्मांचे लोक या मालवणीेत गेल्या अनेक वर्षांपासून गुण्या गोविंदाने नांदत आहेत. ही मालवणी म्हणजे हिंदुस्थान आहे. पण काही मालवणीत येऊन येथील धार्मिक सलोखा बिघडवू पाहत आहेत,अशा लोकांना कायद्याच्या भाषेत उत्तर द्यायला आपण सक्षम असल्याचे त्यांनी शेवटी स्पष्ट केले.

Web Title: Aslam Sheikh Criticize Central Government in Malad-Malvani Congress Rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.