Lokmat Special: नेते एकदम असतात 'कूल', मतदार होतो 'एप्रिल फूल'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 17:45 IST2019-04-01T17:44:03+5:302019-04-01T17:45:14+5:30
आश्वासनांची खैरात वाटणाऱ्या राजकीय पक्षांची थोडीशी फिरकी....

Lokmat Special: नेते एकदम असतात 'कूल', मतदार होतो 'एप्रिल फूल'
- अभय नरहर जोशी
वास्तवाचे भानच थोडे
आश्वासनांची पडते भूल
औट घटकेचा मतदार'राजा'
नंतर होतो 'एप्रिल फूल!'
'अच्छे दिन'च्या स्वप्नांद्वारे
'सबका विकास'ची येते हूल
नंतर लक्षात येते की हो
आपण झालो 'एप्रिल फूल'
'काळे' खात्यात होणार 'पांढरे'
म्हणून नाचतो होऊन मूल
'जुमला' असतो समजते तेव्हा
सारे ठरतो 'एप्रिल फूल'
सत्तर वर्षे गरिबी हटावच्या
नाऱ्याचे अजून आहे खूळ
दीन-दुबळ्यांना होते जाणीव
ठरतात तेव्हा 'एप्रिल फूल'
आपल्या शत्रूसंगे बांधतात
ते आघाडी अन् युतीचे पूल
आपसात झुंजणारे कार्यकर्ते
ठरतात मग 'एप्रिल फूल'
सहा हजार, बहात्तर हजार
खैरातींची उडते धूळ
कोणते खरे, कोणते खोटे
की सारेच आहे 'एप्रिल फूल'?
'पंजा' हवा की 'कमळ' फूल
द्विधा मतदारांची बत्ती गुल
महागाईने या रोजच बनतोय
आम आदमी 'एप्रिल फूल'
भलते वादे देत असताना
नेते एकदम असतात 'कूल'
म्हणतात नंतर हसत हसत
कसे बनवले 'एप्रिल फूल'
...वास्तवाचे भानच थोडे
आश्वासनांची पडते भूल
औट घटकेचा मतदार'राजा'
नंतर होतो 'एप्रिल फूल'!