Another blow to the BJP, Gorkha Janmukti Morcha quite NDA | भाजपाला अजून एक धक्का, एनडीएमधील आणखी एका मित्रपक्षाने सोडली साथ

भाजपाला अजून एक धक्का, एनडीएमधील आणखी एका मित्रपक्षाने सोडली साथ

ठळक मुद्देगोरखा जनमुक्ती मोर्चाने भाजपाची साथ सोडण्याची घोषणा केली पश्चिम बंगालमधील गोरखा जनमुक्ती मोर्चा (जीजेएम) चे नेते बिमल गुरुंग यांनी केली ही घोषणा २०२१ मध्ये होणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूल कांग्रेससोबत आघाडी

नवी दिल्ली - एकीकडे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते असलेल्या एकनाथ खडसेंनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली असतानाच दुसरीकडे राष्ट्रीय राजकारणातहीभाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी(एनडीए)मधील अजून एका मित्रपक्षाने भाजपाची साथ सोडण्याची घोषणा केली आहे. पश्चिम बंगालमधील गोरखा जनमुक्ती मोर्चा (जीजेएम) चे नेते बिमल गुरुंग यांनी ही घोषणा केली आहे.

गेल्या तीन वर्षांपासून बेपत्ता असलेले गोरखा जनमुक्ती मोर्चाचे नेते बिमल गुरुंग आज अचानकपणे कोलकात्यामध्ये प्रकट झाले. त्यानंतर त्यांनी एनडीए सोडत असल्याची घोषणा केली. तसेच २०२१ मध्ये होणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूल कांग्रेससोबत आघाडी करत असल्याचे त्यांनी सांगितले.


बिमल गुरुंग हे आज कोलकात्यामधील सॉल्ट लेक परिसरातील गोरखा भवनमध्ये दिसले. ते प्रथम गोरखा भवनमध्ये गेले. तिथे बाहेरील लोकांना परवानगी नव्हती. त्यानंतर भाजपाने राज्यासाठी काहीच केले नाही, असा आरोप त्यांनी केला. गोरखालँडसाठी आमच्या मागण्या पूर्ण केल्या गेल्या नाहीत, असे ते म्हणाले.

भारतीय जनता पक्षाने जे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता केली नाही. मात्र ममता बॅनर्जी यांनी दिलेल्या सर्व आश्वासनांची पूर्तता केली. त्यामुळे मी स्वत:ला एनडीएपासून वेगळे करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह बंगालमध्ये गोरख्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे माझ्या पक्षाने एनडीए सोडली आहे, असे त्यांनी सांगितले.

२०२१ मध्ये बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्ही तृणमूल काँग्रेससोबत आघाडी करून निवडणूक लढवून भाजपाला चोख प्रत्युत्तर देणार आहोत, असेही गुरुंग यांनी सांगितले. दरम्यान, गुरुंग यांच्या या निर्णयानंतर उत्तर बंगालमधील पर्वतीय भागात भाजपाला किमान १० जागांवर फटका बसू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, सध्या सुरूअसलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी एलजेपीने एनडीएपासून वेगळे होऊन स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती.

Web Title: Another blow to the BJP, Gorkha Janmukti Morcha quite NDA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.