आम्ही तुमच्या मार्गावर चाललो असतो, तर शिवसेनाच उरली नसती; अमित शहांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2021 04:11 PM2021-02-07T16:11:40+5:302021-02-07T17:15:13+5:30

amit shah in sindhudurg : अमित शहा यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर थेट टीका केलीय.

amit shah attacks shiv sena in sindhudurg visit | आम्ही तुमच्या मार्गावर चाललो असतो, तर शिवसेनाच उरली नसती; अमित शहांचा हल्लाबोल

आम्ही तुमच्या मार्गावर चाललो असतो, तर शिवसेनाच उरली नसती; अमित शहांचा हल्लाबोल

Next

"बाळासाहेबांच्या सर्व सिद्धांतांना तापी नदीत बुडवून शिवसेनेनं सत्ता मिळवली. पण आम्ही तुमच्या मार्गानं चालणार नाही. आम्ही तुमच्या मार्गावर चाललो असतो तर शिवसेनाच उरली नसती", असं विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (amit shah) यांनी केलं आहे. ते सिंधुदुर्गात नारायण राणे (narayan rane) यांच्या मेडिकल कॉलेजच्या उदघाटनावेळी बोलत होते. (amit shah attacks shiv sena in sindhudurg visit)

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज सिंधुदुर्गात नारायण राणे यांनी उभारलेल्या लाइफटाइम मेडिकल कॉलेजचं उदघाटन करण्यात आलं. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना अमित शहा यांनी महाविकास आघाडी सरकारवर आणि विशेषत: शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. 

"शिवसेनेनं सत्तेच्या लालसेपोटी जनमताचा अनादर करुन साथ सोडली. राज्यातील सध्याचं सरकार हे तीन चाकी ऑटोरिक्षा सरकार असून याची तिन्ही चाकं वेगवेगळ्या दिशेनं जात आहेत", असा खोचक टोला अमित शहा यांनी लगावला. 

"बंद खोलीत नव्हे, मी खुलेआम वचन देतो"
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरे यांना बंद खोलीत कोणतंही वचन दिलं नव्हतं, असं अमित शहा यांनी सांगितलं. यासोबतच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर यावेळी थेट टीका केली. "शिवसेनेनं खोटंनाटं बोलून आमच्याशी दगाबाजी केली. मी बंद खोलीत वचन दिल्याचं म्हटलं गेलं. पण मी असं कोणतंच वचन दिलं नव्हतं. मी बंद खोलीत नव्हे, तर खुलेआम वचन देणारा आणि ते पाळणारा व्यक्ती आहे. बिहार निवडणुकीत फडणवीस प्रभारी असताना आम्ही नितीश कुमार यांना मुख्यमंत्री करू असं वचन दिलं होतं. बिहारमध्ये नितीश कुमार यांच्यापेक्षा भाजपच्या जास्त जागा निवडून आल्या, पण आम्ही दिलेलं वचन पाळलं आणि नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्री केलं. आम्ही वचन एकदा दिलं की पाळतो", असं अमित शहा म्हणाले. 

मोदींच्या नावावर मतं मागितली
शिवसेनेला मुख्यंत्रीपदाचं आश्वासन दिलं होतं. मग तुमच्या पोस्टरवर मोदींचा फोटो सर्वात मोठा का छापला? मोदींच्या नावानं मतं का मागितली? प्रचारसभेत फडणवीसांना जेव्हा आम्ही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून बोलत होतो. तेव्हा तुम्हा का बोलला नाहीत?, अशा प्रश्नांची सरबत्ती करत अमित शहा यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. 

नारायण राणेंवर भाजपमध्ये अन्याय होणार नाही
अमित शहा यांनी यावेळी नारायण राणे यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली. "नारायण राणे हे अन्यायाविरोधात पाय रोवून उभे राहणारे नेते आहेत. ते अन्याय होत असेल तर भविष्याचा कोणताही विचार न करता अन्यायाचा प्रतिकार करतात. म्हणूनच त्यांची वाटचाल ही वळणावळणाची राहीली आहे. त्यांचा सन्मान आणि आदर कसा करायचा हे आम्हाला चांगलं माहिती आहे. त्यामुळे भाजपमध्ये त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची ग्वाही मी देतो", असं अमित शहा म्हणाले. 
 

Web Title: amit shah attacks shiv sena in sindhudurg visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.