पिंपरी : पतंग कापल्याच्या रागातून एका तरुणाने दुसऱ्या तरुणाला दगडाने मारहाण करीत जखमी केले. ही घटना शनिवारी (दि. ११) सायंकाळी गांधीनगर, देहू रोड येथे घडली. रोहीत उमेश जेगरे (१९, रा.शिवाजीनगर, देहू रोड) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून, त्यांनी रविवारी याबाबत देहू रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. आदित्य काळे (२०, रा.गांधीनगर, देहू रोड) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी फिर्यादी रोहित आणि त्याचा मित्र अविनाश शिवपुरे असे दोघे खेड शिवापूर येथे देवदर्शनासाठी निघाले होते. त्यावेळी त्यांच्यासमोर आदित्य काळे आला.दुपारी आदित्य याच्या पतंगाचा मांजा फिर्यादी राेहित याच्या पतंगाच्या मांजामुळे तुटल्याचा राग त्याच्या मनात होता. पतंग कापल्यावर तू मला का चिडवत होतास, असे म्हणून शिवीगाळ करून फिर्यादी आणि त्याचा मित्र अविनाश शिवपुरे या दोघांनाही हाताने मारहाण केली. तेथे पडलेला दगड उचलून त्याने फिर्यादी रोहित यांच्या डोक्यात मारून जखमी करून पळून गेला.