जागतिक चहा दिन: बदलत्या काळानुसार चहाही होतोय हायटेक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 06:55 IST2018-12-15T02:57:36+5:302018-12-15T06:55:39+5:30
कपापासून ते दुकानाच्या पाटीपर्यंत आकर्षक सादरीकरण

जागतिक चहा दिन: बदलत्या काळानुसार चहाही होतोय हायटेक
पिंपरी : चौकामध्ये कुठेतरी एक टपरी, त्यावर रॉकेलचा स्टोव्ह, त्यावर एक चहाची किटली हीच काय ती चहाच्या दुकानांची पूर्वी ओळख होती. मात्र जसजशी हॉटेल संस्कृती हायटेक रूप धारण करू लागली तशी चहाची दुकानेही बदलू लागली. अलीकडे चहाची दुकाने ही आकर्षक, रोषणाईने फुललेली, हटके रूपात दिसू लागली आहेत. त्यामध्ये चहाच्या कपांपासून ते दुकानांच्या पाट्यांपर्यंत आकर्षक रूप आल्याने उच्चभ्रू ग्राहकही आकर्षित होत आहेत.
थंडीत भरलेली हुडहुडी असो की, कामात आलेला आळस घालवायचा असो, चहा हा प्रत्येकाला हवाच असतो. त्यामुळे ‘चहाला कोणतीही वेळ नसते, मात्र वेळेला चहा हवा असतो’, अशा प्रकारे आकर्षक टॅगलाईन देऊन ग्राहकांना आवाहन केले जाते. त्यामुळे अमृततुल्याला दिवसेंदिवस चांगलीच मागणी वाढत आहे. त्यामध्ये वेगळी चव आणि रसायन विरहित साखरेचा वापर अशा पद्धतीने पित्त होणार नसल्याचा दावा केला जात आहे. अनेक दुकानदार स्पर्धेमुळे इतरांपेक्षा काहीतरी वेगळे देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये दुकानातील आकर्षक रोषणाई, वेगळ्या शैलीतील कप व चहा बनविण्यासाठी खास बनविण्यात आलेली भांडी, विशिष्ट धातूपासून बनविण्यात आलेल्या चहाच्या किटल्या ग्राहकांना आकर्षित करतात.
आरोग्यदायी पदार्थांचा दावा
चहाच्या दुकानांमध्ये कपांची, चहाच्या किटल्यांची विशिष्ट पद्धतीने मांडणी केली जाते. गाडीवर मिळणाऱ्या कटिंग चहापासून विविध प्रकारामध्ये चहा उपलब्ध केले जातात. ग्रीन टी, लेमन टी, ब्लॅक टी असे नानाविध चहाचे प्रकार चोखंदळ ग्राहकांसाठी उपलब्ध असतात. अनेक औषधी तत्त्वे असलेल्या आयुर्वेदिक पदार्थापासूनही चहा बनवले जातात. चहाच्या घोटासोबतच काहीतरी कुरकुरीत खायला हवे म्हणून अनेक दुकानदार बिस्किटे, शेव, क्रीमरोल आपल्या दुकानात ठेवतात. मरगळलेले मन ताजेतवाणे करण्यासाठी वाफाळता चहा हवा असतो. याच चहाचे स्वरूप अलीकडच्या काळात बदलत आहे. टपरीवर भेटणाºया चहाची जागा आता हायटेक अशा स्वच्छ आणि आकर्षक दुकानांनी घेतली आहे.