उसने पैसे परत न दिल्याने कामगाराचा गळा चिरून खून, भोसरी पोलिसांनी संशयिताला मुंबईतून घेतले ताब्यात
By नारायण बडगुजर | Updated: December 22, 2025 22:16 IST2025-12-22T22:16:12+5:302025-12-22T22:16:34+5:30
Pimpari Crime News: उसने दिलेले पैसे परत न दिल्याच्या रागातून धारदार हत्याराने कामगाराचा गळा चिरून खून केला. भोसरीतील बैलगाडा घाट येथे सोमवारी (दि. २२ डिसेंबर) सकाळी ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी एका संशयित कामगाराला मुंबई येथून ताब्यात घेतले.

उसने पैसे परत न दिल्याने कामगाराचा गळा चिरून खून, भोसरी पोलिसांनी संशयिताला मुंबईतून घेतले ताब्यात
- नारायण बडगुजर
पिंपरी - उसने दिलेले पैसे परत न दिल्याच्या रागातून धारदार हत्याराने कामगाराचा गळा चिरून खून केला. भोसरीतील बैलगाडा घाट येथे सोमवारी (दि. २२ डिसेंबर) सकाळी ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी एका संशयित कामगाराला मुंबई येथून ताब्यात घेतले.
दीपक कुमार प्रजापती (वय ४०, रा. शांतीनगर, भोसरी) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. राहुल कुमार प्रजापती (वय २९, रा. शांतीनगर, भोसरी, मूळ रा. उत्तरप्रदेश) यांनी याप्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. विष्णू प्रजापती (२६, रा. शांतीनगर, भोसरी; मूळ रा. प्रयागराज, उत्तरप्रदेश) या संशयिताला पोलिसांनी मुंबई येथून ताब्यात घेतले. भोसरीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप घोरपडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहुल यांचा भाऊ दीपक कुमार प्रजापती हे पत्नी, दोन मुले व एक मुलगी यांच्यासह शांतीनगर येथे वास्तव्यास होते. इंद्रायणीनगर येथील सेक्टर सातमधील एका खासगी कंपनीत ते कामाला होते. दीपक हे रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे कामाला गेले. मात्र, रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाही. सोमवारी सकाळी सातच्या सुमारास बैलगाडा घाट येथे गळा चिरलेल्या अवस्थेत दीपक यांचा मृतदेह आढळून आला. स्थानिक रहिवाशांनी याबाबत पोलिसांना माहिती कळविली.
भोसरी पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. दीपक यांच्या गळ्यावर धारदार हत्याराने वार केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण केले. त्यानुसार विष्णू प्रजापती याने खून केल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने मुंबई येथे जाऊन विष्णू प्रजापती याला ताब्यात घेतले.
पैसे परत न दिल्याचा राग
संशयित विष्णू प्रजापती हा एका खासगी कंपनीत कामाला होता. त्याने दीपक प्रजापती यांना हातउसने पैसे दिले होते. ते पैसे परत करत नसल्याने दीपक यांच्याबाबत विष्णू याला राग होता. त्या रागातून त्याने हेक्साॅ ब्लेडने दीपक यांच्या गळ्यावर वार केले. यात दीपक यांचा मृत्यू झाला. त्यानंतर विष्णू प्रजापती मुंबई येथे निघून गेला. पोलिसांनी शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले.