हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच भाडेकरू?

By Admin | Updated: November 3, 2015 03:35 IST2015-11-03T03:35:20+5:302015-11-03T03:35:20+5:30

समाजात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी घरमालकांनी आपल्या भाडेकरूची माहिती संबंधित पोलीस ठाण्यांना देणे बंधनकारक आहे. माहिती लपवून ठेवल्यास घरमालकांवर

What is the size of the car? | हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच भाडेकरू?

हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच भाडेकरू?

- सचिन देव,  पिंपरी
समाजात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी घरमालकांनी आपल्या भाडेकरूची माहिती संबंधित पोलीस ठाण्यांना देणे बंधनकारक आहे. माहिती लपवून ठेवल्यास घरमालकांवर नियम १८८ अन्वये कारवाईची तरतूद आहे. मात्र, असे असतानाही पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत हजारोंच्या घरात भाडेकरूंची संख्या असतानाही, फक्त बोटावर मोजण्याइतकीच भाडेकरूंची नोंद संबंधित पोलीस ठाण्यामध्ये आहे.यावरून भाडेकरूंची माहिती पोलिसांना देण्यात घरमालकांची उदासीनता स्पष्टपणे दिसून येत आहे. याकडे पोलिसांचेही दुर्लक्ष झालेले असून, माहिती न देणाऱ्या एकाही भाडेकरूवर गेल्या वर्षभरात कारवाई केली नसल्याचे समोर आले आहे.
समाजात गुन्हेगारीच्या अप्रिय घटना घडल्यावर अशा आरोपींचा शोध घेणे पोलिसांसाठी मोठे आव्हान असते. गुन्हेगारीच्या या घटना बऱ्याच वेळा परराज्यांतील लोकांकडून केल्या जात असल्याचे पोलीस तपासात उघडही झाले आहे. अशा वेळी परजिल्हा किंवा परराज्यांतून शहरात आलेल्या व्यक्तीला घरात आश्रय देताना, त्याची संपूर्ण माहिती पोलिसांना देणे बंधनकारक आहे. परंतु पिंपरी-चिंचवड शहरातील बहुतांश घरमालकांनी फक्त भाड्याशी मतलब ठेवून ,त्या भाडेकरूंची माहिती पोलिसांना दिलेली नाही. शहराचा औद्योगिक विस्तार झपाट्याने वाढल्यामुळे रोजगार-व्यवसायासाठी शहरात वास्तव्यासाठी येणाऱ्यांची संंख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातीलच नव्हे, तर उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, राजस्थान या भागातील लोक गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आलेले दिसून येत आहेत.
पिंपरी -चिंचवड शहराची लोकसंख्या आजच्या स्थितीला १५ लाखांच्या घरात पोहचली आहे. जाणकारांच्या मते शहरात १ लाखाच्या वर भाडेकरू आहेत. भोसरी, हिंजवडी, निगडी, आकुर्डी, थेरगाव, वाकड या भागात मोठ्या प्रमाणात भाडेकरूंची संख्या आहे. असे असतानाही बोटावर मोजण्याइतक्याच भाडेकरूंची नोंद पोलीस ठाण्यात आहे.
पोलीस परिमंडळ तीनच्या विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आॅनलाइन पद्धतीने नोंदणी प्रक्रिया सुरू झाल्यापासून आतापर्यंत सर्वांत जास्त भोसरी ठाण्यात १३३० नोंदणी केली आहे. तर सर्वांत कमी
चिंंचवड ठाण्यात ६० घरमालकांनी भाडेकरूंची नोंद केली आहे. निगडी ठाण्यात ४९८, तर एमआयडीसी भोसरी ठाण्यात १४६ जणांनी नोंद केली आहे. पिंपरी पोलीस ठाण्याची मात्र माहिती दिली नाही.

एकावरही कारवाई नाही
घरमालकांना पोलीस ठाण्यात न येता आॅनलाइन पद्धतीने भाडेकरुंची माहिती नोंदविण्याची सक्ती करण्यात आली आहे. यामुळे घरमालकांचाही वेळ वाचला असून, पोलिसांचाही त्रास कमी झाला आहे. पण आॅनलाइन पद्धतीला प्रतिसाद मिळतो आहे की नाही, याची चाचपणी पोलीस प्रशासनातर्फे आॅनलाइनची प्रक्रिया सुरू झाल्यापासून करण्यात आलेली नसल्यामुळे एकावरही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे घरमालकही बिनधास्त आहेत.

माहिती देण्याकडे दुर्लक्ष
शहरात आजच्या स्थितीला हजारो गृहसंस्था आहेत. या गृहसंस्थांच्या रक्षणासाठी ठेवण्यात आलेल्या रखवालदाराची माहिती गृहसंस्था संचालक मंडळाने संबंधित पोलीस ठाण्याला देणे बंधनकारक आहे. कारण, बहुतांश वेळा रखवालदारांकडूनच गुन्हेगारीच्या घटना घडल्या असल्याचे उघड देखील झाले आहे. तसेच करारनाम्यांचीही माहिती पोलिसांना देणे बंधनकारक असतानादेखील याकडे दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे.

घरमालकाने आपल्याकडील भाडेकरूची माहिती आॅनलाइन पद्धतीने नोंदविणे कायद्याने बंधनकारक आहे. घरमालकांनी याकडे दुर्लक्ष न करता त्वरित नोंदणी करावी अन्यथा घरमालकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
- मोहन विधाते,
सहायक पोलीस आयुक्त

Web Title: What is the size of the car?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.