"शाईफेकीचे समर्थन करत नाही, आम्ही जनतेचा सन्मान करतो"
By रोशन मोरे | Updated: March 19, 2023 22:26 IST2023-03-19T22:25:56+5:302023-03-19T22:26:37+5:30
चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्या मनोज गरबडेचे वक्तव्य

"शाईफेकीचे समर्थन करत नाही, आम्ही जनतेचा सन्मान करतो"
रोशन मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी: शाई फेकणे असंवैधानिक आहे. त्याचे समर्थन मी करत नाही. समर्थन आम्ही जनतेच्या आंदोलनाचे करतो. म्हणूनच आम्ही जनतेचा सन्मान करतो, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्या मनोज गरबडे यांनी केले. ते समता सैनिक दलाच्या वर्धापन दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. "न्यायलयीन लढाई लढत असताना समाजातील लोकांकडून मदत म्हणून तब्बल एक दीड लाख रुपये जमा झाले. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आम्ही त्यात आणखी निधी गोळा करून समाजासाठी नऊ लाखांची रुग्णवाहिका घेतली. समाजाचा पैसा समाजाच्या कामी येणे आवश्यक आहे," असेही मनोज गरबडे म्हणाले.
न्यायालयाकडून अन्याय?
समता सैनिक दलाचे अध्यक्ष भीमराव आंबेडकर म्हणाले की, हाथरस प्रकरणामध्ये फक्त एकाच तरुणाला जन्मठेपेची शिक्षा झाली. बाकीच्यांना निर्दोष सोडण्यात आले. दलित तरुणीला न्याय मिळाला नाही. कुठल्याही तरुणीवर होणाऱ्या अत्याचाराचा आम्ही निषेधच करतो. ‘निर्भया’ प्रकरणातील सर्व आरोपींना फाशी झाली. कारण दलित तरुणीवर अत्याचार झालेल्या हाथरस प्रकरणात एकाला जन्मठेप आणि बाकीच्यांना सोडण्यात आले. न्यायालय जात पाहून न्याय मिळतो का? अशी शंका येते.