Pimpri Chinchwad Crime: सगळ्यांना जिवे मारून टाकतो म्हणत वाहनांची तोडफोड, थेरगावमधील घटना
By नारायण बडगुजर | Updated: April 6, 2023 17:33 IST2023-04-06T17:31:08+5:302023-04-06T17:33:38+5:30
ही घटना मंगळवारी (दि. ४) रात्री साडेदहाच्या सुमारास धनगर बाबा मंदिराजवळ थेरगाव येथे घडली...

Pimpri Chinchwad Crime: सगळ्यांना जिवे मारून टाकतो म्हणत वाहनांची तोडफोड, थेरगावमधील घटना
पिंपरी : एक-एकाने पुढे या, एक-एकाला जिवेच मारून टाकतो, असे म्हणत रिक्षा चालकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. तसेच रिक्षासह अन्य वाहनांची तोडफोड करून परिसरात दहशत निर्माण केली. या प्रकरणी वाकड पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. ही घटना मंगळवारी (दि. ४) रात्री साडेदहाच्या सुमारास धनगर बाबा मंदिराजवळ थेरगाव येथे घडली.
स्वप्नील संजय सगर (वय २२, रा. थेरगाव) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी नितीन नारायण भागडे (वय ३३, रा. थेरगाव. मूळ रा. राताळी, ता. सिंदखेड राजा, जि. बुलढाणा) यांनी याप्रकरणी बुधवारी (दि. ५) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नितीन हे त्यांचा मित्र आणि त्याच्या कुटुंबीयांसह रिक्षातून जात होते. त्यावेळी थेरगाव येथील धनगर बाबा मंदिराजवळ आरोपीने कोयत्याने फिर्यादीवर हल्ला केला. फिर्यादीने कोयत्याचा वार हुकवला. त्यानंतर आरोपीने रिक्षाची तोडफोड केली. कोयता हवेत फिरवून मोठमोठ्याने ओरडून परिसरात दहशत पसरवली. माझे नाव स्वप्नील सगर आहे. मी थेरगावात राहतो. एकेकाने पुढे या, एकेकाला जिवे मारून टाकतो, अशी त्याने धमकी दिली. आरोपीने सादिक पठाण यांच्या चारचाकी वाहनाची तसेच अन्य वाहनांची तोडफोड करून नुकसान केले, असे फिर्यादीत नमूद आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.