रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: May 23, 2025 21:24 IST2025-05-23T21:23:31+5:302025-05-23T21:24:04+5:30
वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा असूनदेखील सौम्य कलम का लावले, पोलिसांवर कारवाई व्हायला हवी.

रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
पिंपरी : वाकड येथील वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येच्या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी भेट दिली. 'वैष्णवीच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी कामात कसूर केल्याचे दिसते. सौम्य कलम का लावले, असा प्रश्न खडसे यांनी व्यक्त केला. कोणाचीही गय केली जाणार नाही, असे चाकणकर यांनी सांगितले.
वैष्णवीच्या माहेरी वाकड येथील कस्पटे कुटुंबीयांना चाकणकर यांनी भेट दिली. सांत्वन केले. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर या कस्पटे कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी आल्या होत्या. चाकणकर म्हणाल्या, 'आरोपी कोणत्याही पक्षाचा असला तरी कडक पावले उचलली जाणार आहेत. कोणाचीही गय केली जाणार नाही.' तर खडसे म्हणाल्या, वैष्णवी हगवणे यांची आत्महत्या ही घटना अतिशय वाईट असून पोलिसांनी कामात कसूर केला आहे. वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा असूनदेखील सौम्य कलम का लावले, पोलिसांवर कारवाई व्हायला हवी.'
चाकणकर यांना विचारला जाब
कस्पटे कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी चाकणकर आल्या होत्या. यावेळी उपस्थित महिला आणि संघटनांकडून चाकणकर यांना जाब विचारण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाच्या महिला कार्यकर्त्या आणि उपस्थितांमध्ये वाद रंगला. त्याचबरोबर चाकणकर यांना मराठा समाजाचे धनंजय जाधव व अश्विनी खाडे व इतरांनी जाब विचारला. 'महिला आयोगाने काय कारवाई केली, मीडियासमोर बोला. तुम्ही मयुरी जगताप आणि अश्विनी कस्पटे व अशा इतर भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही कमी पडलात हे मान्य करा, अध्यक्ष या प्रोटोकॉलमधून बाहेर पडा', असे संघटनांकडून सुनावले.
चिल्लर कोण, चर्चा रंगली
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आणि पोलिसांची भूमिका याविषयी खडसे यांनी मत व्यक्त केले होते. त्याबाबत चाकणकर यांना विचारले. त्यावेळी त्या म्हणाल्या, 'महिला आयोग काय काम करतो हे सांगण्याची गरज नाही. खडसे यांच्या सहायकाच्या तक्रारी आल्या आहेत. काही चिल्लर लोक टीका करीत आहेत, त्यांच्याबद्दल काय बोलायचे. ' चाकणकर नक्की कोणाला चिल्लर म्हणाल्या. याबाबत चर्चा रंगली होती.