पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 19:43 IST2025-12-18T19:40:39+5:302025-12-18T19:43:48+5:30
पिंपरी चिंचवडमध्ये उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला असून संजोग वाघेरेंनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
Sanjog Waghere Resigns: राज्यात महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरातील सर्वात मोठे शिलेदार आणि माजी लोकसभा उमेदवार संजोग वाघेरे यांनी आपल्या पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे, वाघेरे यांनी आता भाजपची वाट धरली असून, लवकरच त्यांचा अधिकृत प्रवेश सोहळा पार पडणार आहे.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची कोंडी
निवडणूक आयोगाने १५ जानेवारी रोजी मतदानाची तारीख जाहीर केल्यानंतर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली होती. ठाकरे गटानेही शहरात जोरदार रणनीती आखली होती, मात्र ज्यांच्या खांद्यावर शहराची जबाबदारी होती, त्या संजोग वाघेरे यांनीच साथ सोडल्याने पक्षासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. वाघेरेंच्या जाण्याने केवळ एक नेताच नाही, तर त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांची मोठी फौजही भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे.
संजोग वाघेरे हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) निष्ठावान मानले जायचे. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून मावळमधून निवडणूक लढवली होती. विधानसभेनंतर ते पुन्हा अजितदादांच्या राष्ट्रवादीत परततील, अशी चर्चा रंगली होती. त्यांच्या पत्नी उषा वाघेरे या आधीच राष्ट्रवादीत (अजित पवार गट) सक्रिय आहेत. कौटुंबिक नातेसंबंध आणि स्थानिक गणिते जुळवत त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटलं जात आहे.
लांडगे-काटे आणि वाघेरे यांची 'गुपित' बैठक
भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे आणि संजोग वाघेरे यांच्यातील नातेसंबंध सर्वश्रुत आहेत. गेल्या काही दिवसांपासून आमदार लांडगे आणि भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्यासोबत वाघेरेंच्या गुप्त बैठका सुरू होत्या. या बैठकांमधूनच भाजप प्रवेशाची पटकथा लिहिली गेली. अखेर आज वाघेरे यांनी "मी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे," असे स्पष्ट करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.
पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची ताकद वाढणार
पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता टिकवण्यासाठी भाजप आता अधिक आक्रमक झाली आहे. संजोग वाघेरे यांच्यासारख्या अनुभवी नेत्याला पक्षात घेऊन भाजपने ठाकरे गटाची मोठी पिछेहाट केली आहे. आता वाघेरेंच्या तोडीचा नेता शोधण्याचे मोठे आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर असणार आहे.