दाखल्यासाठी मनस्ताप

By Admin | Updated: November 16, 2015 01:54 IST2015-11-16T01:54:01+5:302015-11-16T01:54:01+5:30

महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागातून स्मशानदाखला मिळाल्याशिवाय मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत प्रवेश दिला जात नाही.

Trouble for the certificate | दाखल्यासाठी मनस्ताप

दाखल्यासाठी मनस्ताप

संजय माने, पिंपरी
महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागातून स्मशानदाखला मिळाल्याशिवाय मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत प्रवेश दिला जात नाही. स्मशानदाखला मिळविण्यासाठी मृत्यूचे कारण विशद करणारा दाखला (डार्इंग डिक्लरेशन) जोडावे लागते. मृत्यूचे कारण विशद करणाऱ्या दाखल्यातील नियमांमध्ये भिन्नता असते. जुन्या पद्धतीचा नको, दुसरा दाखला घेऊन या असे ऐनवेळी सांगितले जात असल्याने मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाइकांना रुग्णालय ते जन्म-मृत्यूनोंदणी कार्यालय असे हेलपाटे मारावे लागतात. कामकाजात सुसूत्रता नसल्याने नातवाइकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात जन्म-मृत्यूनोंदणी विभाग आहे. रुग्णाचा कोणत्याही रुग्णालयात मृत्यू झाला, तर तेथील डॉक्टरकडून मृत्यूचे कारण स्पष्ट करणारा दाखला घेतला जातो. त्या दाखल्यात कोणत्या आजाराने रुग्णाचा मृत्यू झाला, हे नमूद असते. मृत्यूचे कारण स्पष्ट करणारे हे वैद्यकीय प्रमाणपत्र म्हणजे फॉर्म ४ अ होय. डॉक्टरांनी त्यावर मृत्यूचे कारण लिहिल्यानंतर त्या अर्जावर खाली नातेवाइकांनी भरावयाची माहिती असते. त्यात जवळच्या नातेवाइकाचे नाव,पत्ता, वय, मृत व्यक्तीशी नाते असा तपशील असतो. त्याचबरोबर मृत व्यक्तीचे नेत्रदान करायचे की नाही, अशी नातेवाइकांची संमती घेणारा रकाना असतो. डॉक्टरांकडून मिळणाऱ्या दाखल्याच्या आधारे स्मशानदाखला मिळविण्याची प्रक्रिया सुलभ होत असते.
परंतु शहरातील अनेक खासगी रुग्णालयांमध्ये नेत्रदानाविषयी नातेवाइकांची संमती घेण्याचा रकाना नसतो. नेत्रदानासंबंधी काहीही न लिहिलेला मृत्यूचे कारण स्पष्ट करणारा वैद्यकीय दाखला जन्म-मृत्यूनोंदणी कार्यालयात घेऊन गेल्यास हा दाखला जुना आहे, यामध्ये नेत्रदानाचा तपशील नाही, नव्या मसुद्यासह आलेला दाखला आणा, तरच स्मशानदाखला देता येईल, असे सांगितले जाते. नातेवाइकांना सुधारित दाखला मिळविण्यासाठी पुन्हा धावपळ करावी लागते.

Web Title: Trouble for the certificate