आयुक्त बंगल्यासमोरील दुभाजकातील झाडे जळाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2019 15:46 IST2019-08-02T15:40:59+5:302019-08-02T15:46:56+5:30

महापालिकेच्या बेजबाबदारपणामुळे बकुळीचं झाड जळालं ग, असे म्हणण्याची वेळ आली आहे. 

The trees on divider were burned in front of Commissioner Bungalows | आयुक्त बंगल्यासमोरील दुभाजकातील झाडे जळाली

आयुक्त बंगल्यासमोरील दुभाजकातील झाडे जळाली

ठळक मुद्देराज्य शासनाचा ३३ लाख झाडे लावण्याचा संकल्प : अशास्त्रोक्त पद्धतीने केली लागवड : ९१ पैकी १९ झाडे मरणासन्न; उद्यान विभागाचा गलथानपणा

- नारायण बडगुजर 
 पिंपरी : मोरवाडीतील आयटीआयला लागून महापालिका आयुक्त बंगला ते न्यायालयाच्या ९०० मीटर अंतराच्या रस्ता दुभाजकात बकुळीची ९१ झाडे लावली होती. ही झाडे अशास्त्रीय पद्धतीने व चुकीच्या ठिकाणी लागवड केल्याने १९ झाडे जळाली आहेत. बकुळीचं झाड झरलं ग, फुलांनी अंगण भरलं गं... असे वर्णन आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांनी केले होते, मात्र, महापालिकेच्या बेजबाबदारपणामुळे बकुळीचं झाड जळालं ग, असे म्हणण्याची वेळ आली आहे. 
राज्य शासनाने ३३ लाख झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमात विविध शासकीय, निमशासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनीही सहभाग घेतला आहे. त्याअंतर्गत महापालिकेकडूनही शहरात दीड लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. मात्र, लागवड केलेल्या वृक्षसंवर्धनाकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. 
आयुक्तांच्या निवासस्थाना समोरील रस्ता मोरवाडी न्यायालय चौकात येतो. न्यायालयापासून आयुक्तांचा बंगला नऊशे मीटर अंतरावर आहे. या रस्त्याचे सुशोभीकरण केले आहेत. दुभाजकात बकुळीची ९१ झाडे लावली होती. मात्र, १९ झाडे जळाली आहेत. या वृक्षांची पाहणी लोकमतने केली. त्यावेळी अरुंद दुभाजक, येथे खडक असून जमिनीचा पोत, माती कमी असल्याचे दिसले. 

वृक्षारोपण केवळ नावालाच
वृक्षारोपणाचा आकडा वाढविण्यासाठी महापालिका कोठेही व कोणत्याही जातीच्या झाडांची लागवड करीत आहेत. परिणामी झाडे तग धरत नाहीत. वेळ, पैसा खर्च होऊनही वृक्षारोपणाचा उद्धेश साध्य होत नाही. हरीत शहराचा निर्धार महापालिकेकडून केला जात असताना आयुक्तांच्या बंगल्यासमोरील झाडे अर्थात हिरवळ धोक्यात आली आहे. आयुक्तांच्या बंगल्यासमोरील दुभाजकातील झाडे जळाली आहेत. महापालिका प्रशासन आणि उद्यान विभागाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.

झाडे कोणत्या जातीची आहेत, त्यांचे आयुर्मान, त्यांचा आकार, त्यांच्या मुळांचा विस्तार आदी बाबींचा अभ्यास करूनच वृक्षलागवड झाली पाहिजे. वृक्षारोपण करताना त्यासाठीची जागा, मातीचा पोत, खडक किती अंतरावर आहे याचाही विचार करणे आवश्यक असते. त्यानंतरच शास्त्रोक्त पद्धतीने वृक्षारोपण करावे. त्यानंतर त्याचे संवर्धनही महत्त्वाचे आहे. 
- अरुण कांबळे, प्राध्यापक, कृषी महाविद्यालय, पुणे

.............

मोरवाडी येथील दुभाजकात बकुळीची झाडे आहेत. दुभाजकाखाली खडक असल्याने त्यांच्या मुळांच्या वाढीवर मयार्दा आली. परिणामी ही झाडे जळाली आहेत. त्याजागी तग धरू शकणारी दुसरी झाडे लावण्यात येणार आहेत. 
- सुरेश साळुंखे, अधीक्षक, उद्यान विभाग, महापालिका

Web Title: The trees on divider were burned in front of Commissioner Bungalows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.