वाकड परिसरातून १४ बसेस कर्नाटकच्या दिशेने धावल्या; सव्वा तीनशे मजुरांना घराच्या वाटा दिसल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 03:28 PM2020-05-12T15:28:08+5:302020-05-12T15:33:53+5:30

राज्याच्या सीमेवर सोडणार

Three hundred laborers from Wakad police station area were sent to Karnataka | वाकड परिसरातून १४ बसेस कर्नाटकच्या दिशेने धावल्या; सव्वा तीनशे मजुरांना घराच्या वाटा दिसल्या

वाकड परिसरातून १४ बसेस कर्नाटकच्या दिशेने धावल्या; सव्वा तीनशे मजुरांना घराच्या वाटा दिसल्या

Next
ठळक मुद्दे काळेवाडी, रहाटणी व थेरगाव परिसरात हजारो बांधकाम मजूर व कामगार वास्तव्यास वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परप्रांतीय मजुरांची माहिती संकलित

पिंपरी : लॉकडाऊनमुळे पिंपरी-चिंचवड शहरात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मूळगावी सोडण्यात येत आहे. सोमवारी १२०७ मजूर उत्तराखंड येथे रेल्वेने रवाना झाले. त्यापाठोपाठ वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सव्वातीनशे मजुरांना एसटी बसने कर्नाटक सीमेवर सोडण्यात आले. 

हिंजवडी आयटी पार्क परिसराला लागून असलेल्या वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात गृह प्रकल्प उभारण्यात येत आहेत. त्यासाठी काळेवाडी, रहाटणी व थेरगाव परिसरात हजारो बांधकाम मजूर व कामगार वास्तव्यास आहेत. लॉकडाऊन झाल्यामुळे सर्वच उद्योग, व्यवसायासह बांधकामे बंद आहेत. त्यामुळे सर्व मजूर व कामगारांचे काम गेले. परिणामी ते आर्थिक अडचणीत आले. शासन व विविध संघटना व संस्था तसेच काही दानशूर व्यक्तींनी त्यांना मदतीचा हात दिला. मात्र लॉकडाऊन वाढल्याने त्यांचा धीर सुटला. मदत नको, आम्हाला आमच्या मूळगावी जाऊ द्या, असा तगादा त्यांनी लावला. त्यानुसार त्यांना त्यांच्या मूळगावी रवाना करण्यात येत आहे.

वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परप्रांतीय मजुरांची माहिती संकलित करण्यात आली. पहिल्या टप्प्यात कर्नाटक येथील मजुरांना सोडण्याचे नियोजन केले. एका बसमधून सरासरी २२ प्रवाशांना प्रवासाची परवानगी दिली आहे. सोमवारी दुपारी पिंपरी येथील वल्लभनगर बसस्थानकातून १४ बस रवाना करण्यात आल्या. वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने, राज्य परिवहन महामंडळाच्या वल्लभनगर आगाराच्या व्यवस्थापक पल्लवी पाटील आदी या वेळी उपस्थित होते. 

दरम्यान पोलिसांनी या मजुरांना सोमवारी संपर्क साधून प्रवासाबद्दल माहिती दिली. मंगळवारी सकाळी त्यांना त्यांच्या रहाटणी, काळेवाडी व थेरगाव परिसरातून पीएमपीएमएलच्या बसने वल्लभनगर बसस्थानकात पोहचविण्यात आले. त्यानंतर तेथे त्यांचे स्क्रिनिंग केले. तसेच प्रत्येक बसचा चालक व वाहक यांचे देखील स्क्रिनिंग झाले. प्रवासी मजूर व चालक - वाहकांना आरोग्य विभागाच्या पथकाकडून वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यात आले. फिजिकल डिस्टन्सिंग पाळत मजुरांनी रांगा लावल्या होत्या. या वेळी त्यांना फुड पॅकेट, पाण्याच्या बाटल्या देण्यात आल्या. 

हातावर पोट असलेल्या या मजुरांसोबत महिला व लहान मुले होती. महामारी असतानाही आम्हाला आमच्या मूळगावी जाता यावे म्हणून प्रशासन व पोलिसांनी जिवावर उदार होऊन नियोजन केले. आमचा धीर सुटला होता. मात्र आता मूळगावी जात आहे. त्यामुळे आम्हाला खूप बरे वाटत आहे, असे सांगताना हे प्रवासी मजूर भावूक झाले होते. 

............................
भोसरी येथील आदिवासी बांधव बसने रवाना
शहरात भोसरी परिसरात काही आदिवासी बांधव वास्तव्यास. या बांधवांसाठी सोमवारी दुपारी बस सोडण्यात आल्या. भोसरी येथून धुळे व नंदुरबार जिल्ह्याकडे या बस रवाना झाल्या होत्या. त्यामुळे या आदिवासी बांधवांनी देखील आनंद व्यक्त केला होता.
पहिल्या टप्प्यात कर्नाटक सीमेपर्यंत १४ बस रवाना केल्या आहेत. परप्रांतीय मजुरांसाठी या बस मोफत उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. राज्याच्या सीमेवर या मजुरांची आरोग्य तपासणी करण्यात येईल. तसेच ज्यांच्याकडे वैद्यकीय प्रमाणपत्र आहे त्यांनाच त्या राज्यात प्रवेश देण्यात येणार आहे.
- डॉ. विवेक मुगळीकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाकड

................

शासन निर्देशानुसार बस उपलब्ध करून देण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात २६ बसचे नियोजन केले आहे. त्यातील १४ बस वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परप्रांतीय मजुरांसाठी सोडल्या आहेत. - पल्लवी पाटील, व्यवस्थापक, वल्लभनगर आगार, पिंपरी

Web Title: Three hundred laborers from Wakad police station area were sent to Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.