पिंपरी-चिंचवड शहरातील रेड झोनची होणार मोजणी, खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 01:41 PM2023-12-27T13:41:44+5:302023-12-27T13:43:23+5:30

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उल्हास जगताप, विजयकुमार खोराटे उपस्थित होते...

The red zone in Pimpri-Chinchwad city will be counted, the expenditure approved in the standing committee meeting | पिंपरी-चिंचवड शहरातील रेड झोनची होणार मोजणी, खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता

पिंपरी-चिंचवड शहरातील रेड झोनची होणार मोजणी, खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता

पिंपरी :पिंपरी-चिंचवड शहरातील रेड झोनची मोजणी करण्यात येणार आहे. त्यासाठीच्या खर्चास प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समिती बैठकीत मान्यता दिली. महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उल्हास जगताप, विजयकुमार खोराटे उपस्थित होते.

शहरातील किवळे, तळवडे, विकासनगर, दिघी, मोशी, भोसरी, बोपखेल या परिसरात रेड झोन आहे. त्याची मोजणी करण्यात येणार आहे. तसेच शिवनगरी, बिजलीनगर, प्रेमलोक पार्क भागातील डांबरी रस्त्यांची हॉटमिक्स पद्धतीने आणि विविध डांबरी रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे करण्यासाठी येणाऱ्या खर्चास, ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत पिंपळेगुरव प्राथमिक शाळा क्रमांक ५४ तसेच शेवंताबाई प्राथमिक शाळा क्रमांक ५६, वैदू वस्ती या इमारतीची स्थापत्यविषयक देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता दिली.

आकुर्डी, दत्तवाडी, काळभोरनगर व परिसरातील स्वच्छतागृहांचे नूतनीकरण व दुरुस्ती करण्यासाठी आणि गावडे कॉलनी, उद्योगनगर, सुदर्शननगर व इतर परिसरामध्ये फुटपाथ, पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात येणार आहे. चऱ्होली, वडमुखवाडी, चोवीसावाडी व इतर परिसरात ठिकठिकाणी रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता दिली.

आकुर्डी परिसरातील जलनि:सारण व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी व उर्वरित ठिकाणी जलनि:सारण नलिका टाकण्यासाठी आणि प्रभाग क्रमांक १४ मधील डांबरी रस्त्यांच्या चरांची कामे करण्यात येणार आहेत. विकासनगर, भीमाशंकर कॉलनी, दत्तनगर भागातील डांबरी रस्त्यांची हॉटमिक्स पद्धतीने दुरुस्ती करण्यात येणार आहे.

ग्रंथालयाकरिता कथा पुस्तके खरेदी

क्रांतिवीर चापेकर वाडा येथे ऑडियो-व्हिडीओ व्हिज्युअल, प्रोजेक्शन मॅपिंग व विविध डिजिटलायझेशनविषयक कामांसाठी तसेच भाटनगर व इतर झोपडपट्टीमधील महापालिका इमारतींची स्थापत्यविषयक कामे करण्यात येणार आहे. महापालिका प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्राथमिक शाळांमधील ग्रंथालयाकरिता आवश्यक कथा पुस्तके खरेदी करण्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता दिली.

तरतूद वर्गीकरण

प्रभाग क्रमांक २४ येथील रत्नदीप कॉलनी, मंगलनगर, गुजरनगर, लक्ष्मणनगर, संतोषनगर, सदाशिव कॉलनी व इतर आवश्यक परिसरातील रस्ते हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्यासाठी आणि महापालिकेचे ई-क्षेत्रीय कार्यालय, विद्युत विभागांतर्गत विविध कामांकरिता सन २०२३-२४ च्या तरतुदीमधील शिल्लक तरतूद वर्गीकरण करण्यात येणार आहे. मृत जनावरांची विल्हेवाट लावणे या लेखाशीर्षावरील रक्कम वर्ग करण्यात येणार आहे.

Web Title: The red zone in Pimpri-Chinchwad city will be counted, the expenditure approved in the standing committee meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.