स्थायी सभापतींना दहा नगरसेवक निवडीचे टार्गेट
By Admin | Updated: March 2, 2016 00:59 IST2016-03-02T00:59:01+5:302016-03-02T00:59:01+5:30
महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदासाठी सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रसकडून डब्बू आसवानी यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला

स्थायी सभापतींना दहा नगरसेवक निवडीचे टार्गेट
पिंपरी : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदासाठी सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रसकडून डब्बू आसवानी यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात असून, आता केवळ निवडणुकीची औपचारिकता बाकी आहे. शनिवारी या निवडीवर शिक्कामोर्तब होणार आहे. दहा नगरसेवक निवडून आणण्याच्या ‘टार्गेट’ देत आसवानी यांना स्थायीच्या सभापतिपदी संधी देण्यात आल्याचे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
स्थायी समितीत सध्या राष्ट्रवादीचे १२, शिवसेनेचे दोन, काँगे्रसचे एक आणि अपक्ष आघाडीचे एक असे सोळा सदस्य आहेत. सभापतिपदासाठी इच्छुकांमध्ये सविता साळुंखे, नारायण बहिरवाडे, संजय वाबळे, डब्बू आसवाणी, अमिना पानसरे यांच्यात चुरस होती. अखेर आसवानी यांना संधी दिली. आसवानी यांना संधी देताना पक्षाकडून त्यांना आगामी २०१७च्या महापालिका निवडणुकीसाठी ‘टार्गेट’ देण्यात आले आहे. पिंपरीतील दहा नगरसेवक निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे.
सभापतिपदी कोणाला संधी मिळणार, याबाबत उत्सुकता होती. अखेर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोनवरून आसवानी यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर महापौर शकुंतला धराडे, प्रभाकर वाघेरे, अतुल शितोळे, मंगला कदम, संजोग वाघेरे, सुजाता पलांडे यांच्या उपस्थितीत आसवानी यांचा उमेदवारी अर्ज उल्हास जगताप यांच्याकडे दाखल केला. आसवानी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड निश्चित आहे. (प्रतिनिधी)