पुनावळेतील बांधकाम ठेकेदाराचा संशयास्पद मृत्यू

By नारायण बडगुजर | Updated: January 29, 2025 22:34 IST2025-01-29T22:33:12+5:302025-01-29T22:34:05+5:30

महामार्गावर बारा तासांनंतर मिळून आला मृतदेह

suspicious death of construction contractors in punawale | पुनावळेतील बांधकाम ठेकेदाराचा संशयास्पद मृत्यू

पुनावळेतील बांधकाम ठेकेदाराचा संशयास्पद मृत्यू

नारायण बडगुजर, लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी : पुनावळे येथून सायकलिंगसाठी घराबाहेर पडलेल्या बांधकाम ठेकेदाराचा १२ तासांनंतर मृतदेह आढळून आला. त्यामुळे खळबळ उडाली. किवळे येथे देहूरोड बाह्यवळण मार्गावर बुधवारी (दि. २९) सकाळी मृतदेह आढळला.  

भानूकुमार सिंग (४२, रा. पुनावळे, मूळ रा. बिहार), असे मृत्यू झालेल्या बांधकाम ठेकेदाराचे नाव आहे. त्यांच्या मागे पत्नी पूजा सिंग (३८) आणि मुलगी दिया सिंग (८) असा परिवार आहे. भानूकुमार हे गेल्या काही दिवसांपासून सायकलिंग करीत होते. कामावरून परतल्यानंतर ते दररोज सायंकाळी सायकलिंगसाठी घरातून बाहेर पडायचे. त्यानंतर रात्री साडेआठच्या सुमारास घरी परतायचे. ते नेहमीप्रमाणे मंगळवारी (दि. २८) सायंकाळी साडेसातच्या सुमारास पुनावळे येथून घरातून सायकल घेऊन बाहेर पडले. मात्र, साडेआठला ते परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबियांनी त्यांच्यांशी मोबाइल फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी फोन काॅल रिसिव्ह केले नाहीत. त्यानंतर त्यांचा शोध सुरू केला.

दरम्यान, बुधवारी (दि. २९) सकाळी किवळे येथे बाह्यवळण मार्गावर भानूकुमार यांचा मृतदेह आढळला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी मृतदेहाजवळील मोबाइलवरून त्यांनी भानूकुमार यांच्या नातेवाकांना माहिती दिली. त्यानंतर कुटुंबियांनी आणि नातेवाइकांनी घटनास्थळी जाऊन ओळख पटवली. पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.  

मृत्यूचे कारण अस्पष्ट

वाहनाच्या धडकेने भानूकुमार यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. भानूकुमार यांचा मृत्यू संशयास्पद वाटत असून, त्यादृष्टीने पोलिसांनी तपास करावा, अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात आली आहे.

Web Title: suspicious death of construction contractors in punawale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.