पिंपरी : एक तरुण बेपत्ता असल्याची फिर्याद त्याच्या कुटुंबीयांनी दिली. तसेच तो विनयभंगाच्या गुन्ह्यातही फरार होता. पोलिस त्याचा शोध घेत असल्याने तो स्वतः पोलिस चौकीत हजर झाला. मला का शोधत आहात, अशी विचारणा करीत त्याने साफसफाईसाठी वापरण्यात येणारे औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना चिंचवड येथील मोहननगर चौकीत गुरुवारी (दि. ६) रात्री अकराच्या सुमारास घडली.
रुपेश राम बहिरवाडे (२५, रा. चिंचवड स्टेशन जवळ, चिंचवड) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या तरुणाचे नाव असून, पोलिसांनी त्याच्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस हवालदार दत्तात्रय भागुजी निकम (वय ४३) यांनी शुक्रवारी (दि. ७) याबाबत पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पिंपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपेश याच्यावर दोन महिन्यांपूर्वी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून तो घरातून निघून गेला होता. यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी रुपेश बेपत्ता असल्याची फिर्याद दिली. या दोन्ही प्रकरणात पिंपरी पोलिस रुपेश याचा शोध घेत होते. दरम्यान, तो आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत असल्याने विनयभंगातील फिर्यादी व तिचे कुटुंबीय भयभीत झाले होते. संशयिताला अटक करण्याची मागणी त्यांच्याकडून वारंवार होत असल्याने पोलिस त्याचा शोध घेत होते.