ठेक्यासाठी मारहाण, अपहरण, गोळीबारापर्यंत मजल
By Admin | Updated: January 14, 2016 03:53 IST2016-01-14T03:53:20+5:302016-01-14T03:53:20+5:30
औद्योगिक क्षेत्राबरोबर बांधकाम क्षेत्रालाही माथाडी कामगार संघटनेच्या दादागिरी आणि गुंडगिरीने विळखा घातला आहे. माथाडी कामगारांचा ठेका मिळविण्यासाठी कोणत्याही थराला

ठेक्यासाठी मारहाण, अपहरण, गोळीबारापर्यंत मजल
पिंपरी : औद्योगिक क्षेत्राबरोबर बांधकाम क्षेत्रालाही माथाडी कामगार संघटनेच्या दादागिरी आणि गुंडगिरीने विळखा घातला आहे. माथाडी कामगारांचा ठेका मिळविण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची संघटनांच्या नेत्यांची वृत्ती दिसून येत आहे. काम मिळविण्यासाठी बांधकाम व्यावसायिकाला, तर कधी कंपनी उद्योजकाला मारहाण करण्यापर्यंत त्यांनी मजल मारली आहे.
पिंपरी-चिंचवड, हिंजवडी, तळेगाव, चाकण या औद्योगिक परिसरात दहा हजारांपेक्षा अधिक छोटे-मोठे कारखाने आहेत. सर्वत्र मोठ्या प्रमाणात बांधकामे केली जात आहेत. व्यापारी, तसेच निवासी अशा टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. औद्योगिक आणि बांधकाम, तसेच शॉपिंग मॉल, दुकाने, आयटी पार्क या ठिकाणी कामाचा ठेका मिळावा म्हणून माथाडी कामगार संघटनांचे नेते आणि कार्यकर्ते तत्पर असतात. ठेका मिळविण्यासाठी त्यांच्यात स्पर्धा तीव्र आहे. दुसऱ्या संघटनेकडून ठेका हिसकावून घेण्यासाठीही टोळ्यांमध्ये स्पर्धा असल्याचे धक्कादायक चित्र आहे.
यास स्थानिक लोकप्रतिनिधींची फूस असल्याचे उघड सत्य आहे. गुंड प्रवृत्तीची मंडळी, सराईत गुन्हेगार, कार्यकर्ते, नातेवाईक यांना गोळा करून संघटना आणि टोळ्या उदयास आल्या आहेत. बोगस संघटनांचा भरणा आहे. काही संघटनांना मान्यताच नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. माथाडी कायद्याचा धाक दाखवीत उद्योजक, कंपनी अधिकारी, व्यावसायिक, व्यापाऱ्यांवर दबाव टाकला जातो. अनेकदा गुंडगिरी, दादागिरी करीत ब्लॅकमेलिंग केले जाते. (प्रतिनिधी)
हद्दीचा वाद : इतरांना अटकाव
माथाडी संघटनांची अघोषित हद्द ठरलेली आहे. अधिकृत नोंदणी असलेल्या संघटना असून, असंख्य बोगस संघटना आणि टोळ्या कार्यरत आहेत. राजकीय, तसेच अनेक सामाजिक संस्थांनीही यात उडी घेतली आहे. संघटनांची एका भागात हद्द ठरलेली असते. त्या भागात इतरांना प्रवेश नसतो. मात्र, एखाद्या संघटनेने प्रवेश करून ठेका मिळविल्यास भांडणे आणि वाद निर्माण केले जातात. दादागिरी करून त्या संघटनेकडून ठेका हिसकावून घेतला जातो. नवी संघटना प्रबळ असल्यास तिच्याबरोबर समझोता केला जातो. प्रसंगी लोकप्रतिनिधी त्यात मध्यस्थी करतात.
उद्योगांचे नुकसान
ठेका मिळविण्यासाठी भांडणे, हाणामारीपर्यंत त्यांची मजल जाते. गुन्हेगारी प्रवृत्ती असल्याने कोणत्याही थरापर्यंत जाण्यास ते घाबरत नाहीत. उद्योगाचे नुकसान करणे, अधिकारी, कामगार, सुरक्षारक्षकांना धमकावणे, वेगवेगळ्या पद्धतीने त्रास होऊन गैरसोय केली जाते.
व्यावसायिकाला मारहाण
व्यावसायिकास वारंवार सांगूनही न ऐकल्यास अपहरण करण्याचा प्रयत्न केला जातो. असा प्रकार ३१ डिसेंबरला पुनावळे येथे घडला होता. एका बांधकाम व्यावसायिकाला तिघांनी रिक्षातून पळवून नेले. त्यांना पट्ट्याने मारहाण केली गेली होती आणि तिघे पळून गेले. बांधकामावर माल उतरविण्याचाठेका देण्यासाठी ते तिघे व्यावसायिकावर अनेक दिवसांपासून दबाव टाकत होते. होकार न दिल्याने भरदिवसा त्यांचे अपरहण करून मारहाण केली. याप्रकरणी वाकड पोलिसांनी किरकोळ गुन्हा दाखल केला.
ठेक्यासाठी गोळीबार
दि. १२ जानेवारीला एकावर गोळीबार केला गेला. हा प्रकारही पुनावळे भागातच घडला. बांधकामावर मिळालेला ठेका हिसकावून घेण्यासाठी गोळीबार केला. मात्र, नेम हुकल्याने कोणी जखमी झाले नाही. गोळीबार केल्यानंतर चारही हल्लेखोर पळून गेले. यावरून स्पर्धा किती तीव्र आहे, हे दिसून येते. येथे ठेका मिळविलेले आणि मिळविण्याचा प्रयत्न करणारे दोन्ही संघटनांचे नेते, कार्यकर्ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत, ही बाब लक्षात घेतली पाहिजे. दि. ११ फेब्रुवारी २०११ला ठेका वादातून म्हाळुंगे, ता. खेड माथाडी संघटनेचे नेते संतोष वाळके यांचा खून झाला होता.
तक्रारीकडे काणाडोळा
मारहाण, अपहरण, गोळीबार असे प्रकार पिंपरी-चिंचवड, तळेगाव, चाकण औद्योगिक आणि हिंजवडी परिसरात नेहमीच घडत आहेत. त्याची विशेष दखल पोलिसांकडून घेतली जात नाही. किरकोळ गुन्ह्याची नोंद करून त्यावर पांघरूण घातले जाते. यामुळे ही प्रवृत्ती फोफावत चालली आहे.
त्रासलेले उद्योजक
या ब्लॅकमेलिंगला उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी त्रासले आहेत. पोलीस, राज्य शासन आणि एमआयडीसीकडे वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. यामुळे माथाडी दहशत वाढतच चालली आहे. यातून मारहाण, अपहरण, गोळीबार होत आहेत. हा दहशतवाद पूर्णपणे निपटून काढण्याची वेळ आली आहे. यासाठी राज्य सरकार, एमआयडीसी आणि पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेणे गरजेचे असल्याचे मत औद्योगिक क्षेत्रातून व्यक्त केले जात आहे.