पराग कुंकुलोळपिंपरी- चिंचवड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन महिन्यांपासून शहरातील विविध भागात रस्त्यावर अहोरात्र उभे राहून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. रखरखत्या उन्हात नाकाबंदीसाठी उभ्या ठाकलेल्या पोलिसांना ताडपत्रीच्या छताचा आधार होता. मात्र, कालच्या वादळात सावली देणारे हे छत उद्धस्त झाल्याने येथे असणारी सावली हिरावली आहे. तरीही नागरिकांची सुरक्षितता आणि कोरोनाला हरविण्याची जिद्द ठेवत या खाकी वर्दीतील माणूस आपले कर्तव्य बजावत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी स्वीकारत दिवस रात्र पहारा देणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी रस्त्यावर दिसत आहेत.कोणत्याही अडचणींची तक्रार न करता नागरिकांच्या सुरक्षितते साठी ते स्वत:चा जीव धोक्यात घालून कर्तव्यावर उपस्थित आहेत.सध्या उन्हाच्या तडाख्याने लाही लाही होत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेसाठी ताडपत्री चे छत बनविण्यात आले आहेत.कित्येक ठिकाणी तर डोक्यावर कशाचाही आधार नसल्याचे वास्तव शहरातील नाका बंदीवर दिसत आहे.काल शहरात झालेल्या वादळी पावसाने अनेकांची धांदल उडविली.सोसाट्याचा वारा चिंचवड मधील दळवीनगरातील ताडपत्रीचे शेड उध्वस्त करून गेला.या ठिकाणी पोलिसांना मिळणारी सावली आज या वादळाने हिरावली आहे.मात्र कोणतीही तक्रार न करता हे बहादूर कर्मचारी पुन्हा आपल्या कामावर हजर राहून कर्तव्य बजावत आहेत.
रखरखत्या उन्हात पोलिसांच्या आधाराची सावली, वादळाने एका क्षणात हिरावली..
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 16:30 IST