संपकरी कामगारांचा रास्ता रोको
By Admin | Updated: January 22, 2016 01:23 IST2016-01-22T01:23:29+5:302016-01-22T01:23:29+5:30
तळेगाव जनरल हॉस्पिटलच्या कामगारांनी पुकारलेल्या संपाचा दहावा दिवस बैठका आणि रास्ता रोकोमुळे गाजला

संपकरी कामगारांचा रास्ता रोको
तळेगाव स्टेशन : तळेगाव जनरल हॉस्पिटलच्या कामगारांनी पुकारलेल्या संपाचा दहावा दिवस बैठका आणि रास्ता रोकोमुळे गाजला. कामगारांनी दिलेल्या रास्ता रोकोच्या इशाऱ्यानंतर तळेगाव पोलीस ठाण्यात झालेल्या बैठकीतही जुने मुद्देच पुन्हा समोर आल्याने कामगार आणि एमआयटी व्यवस्थापन यांच्यात समेटाचे प्रयत्न फोल ठरले. बैठकीनंतर दुपारी दोनच्या दरम्यान तळेगावातील सर्वपक्षीय पुढारी आणि कामगारांनी चाकण-तळेगाव रस्त्यावर मोर्चा काढून अर्धा तास रास्ता रोको केले.
हॉस्पिटलच्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कामगारांनी प्रलंबित मागण्यांसाठी पुणे जिल्हा मजदूर संघातर्फे तळेगाव-चाकण मार्गावरच मोर्चा काढून सभा घेत अर्धा तास रास्ता रोको केला. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. पाठिंबा देण्यासाठी नगराध्यक्षा माया भेगडे, उपनगराध्यक्ष गणेश खांडगे, माजी उपनगराध्यक्ष सत्येंद्रराजे दाभाडे (सरकार), भाजपाचे नगरसेवक सुशील सैंदाणे, गणेश भेगडे, आरपीआय, शिवसेनेचे पदाधिकारी सहभागी झाले.
आंदोलन चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने सकाळीच जादा कुमक मागविली होती. पोलीस अधीक्षक जय जाधव, पोलीस उपविभागीय अधिकारी विवेक पानसरे, पोलीस निरीक्षक वसंत बाबर, सहायक निरीक्षक राजेंद्र पाटील, वायसिंग पाटील, देहूरोड ठाण्याचे निरीक्षक अमर वाघमोडे आदींनी खबरदारी घेत परिस्थिती हाताळली.
आंदोलनावेळी झालेल्या भाषणात बोलताना उपनगराध्यक्ष खांडगे यांनी व्यवस्थापनाने बाहेरून दोनशे गुंड आणल्याचा आरोप करून मंगेश कराड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. ते म्हणाले, ‘येत्या दोन दिवसांत उर्वरित मागण्या मान्य केल्यास सर्व कामगार आणि कर्मचारी डॉक्टरांना सहकार्य करतील. परंतु, एकाही कामगाराच्या केसाला धक्का लागला, तर आंदोलन तीव्र करण्यात येईल.’’
मजदूर संघाचे बाळासाहेब भुजबळ म्हणाले की, कामगारांच्या मागण्या पूर्ण होऊन न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवणार आहोत.(वार्ताहर)