पिंपरी : अत्यावश्यक सेवेचा पास मिळावा म्हणून पोलीस ठाण्यात चकरा मारणारा व्यावसायिक कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात हा प्रकार घडला. त्यामुळे संबंधित पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची पाचावर धारण बसली आहे. कोेरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. वाहनबंदी व जमावबंदी असल्याने पोलिसांकडून शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. मात्र जीवनावश्यक वस्तू तसेच अत्यावश्यक सेवेतील वाहने व नागरिकांना यातून वगळण्यात आले आहे. या सेवेतील नागरिकांना पोलिसांकडून पास उपलब्ध करून देण्यात येत आहेत. पोलीस ठाणे स्तरावर या पासचे वितरण होत आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित नागरिकांना अर्ज करावा लागतो. त्यानुसार एक व्यावसायिक त्याचे दुकान सुरू करण्यासाठी पास मिळावा म्हणून पोलीस ठाण्यात गेला होता. तेथे अर्ज करून पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांशी त्याने चर्चा केली. त्यानंतर संबंधित व्यावसायिकाला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची बाब समोर आली. त्यामुळे या पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांची पाचावर धारण बसली आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून पोलीस ठाण्यात निर्जंतुकीकरणासाठी फवारणी करण्यात येणार आहे. तसेच अति अत्यावश्यक काम असेल तरच नागरिकांना पोलीस ठाण्यात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आवश्यकता असल्यास पोलिसांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
धक्कादायक! अत्यावश्यक सेवेच्या पाससाठी पोलीस ठाण्यात चकरा मारणारा व्यावसायिक निघाला कोरोनाबाधित
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 20:42 IST
एक व्यावसायिक त्याचे दुकान सुरू करण्यासाठी पास मिळावा म्हणून पोलीस ठाण्यात गेला होता.
धक्कादायक! अत्यावश्यक सेवेच्या पाससाठी पोलीस ठाण्यात चकरा मारणारा व्यावसायिक निघाला कोरोनाबाधित
ठळक मुद्देखबरदारीची उपाययोजना म्हणून पोलीस ठाण्यात निर्जंतुकीकरणासाठी फवारणी करण्यात येणार आवश्यकता असल्यास पोलिसांची आरोग्य तपासणी करण्यात येणार