पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर प्रतिनियुक्तीने सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी आज (गुरुवारी) अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उल्हास जगताप यांच्या उपस्थितीत आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला.
ओडिसा केडरचे २००५ च्या बॅचचे आयएस राजेश पाटील यांची आंतरराज्य प्रतिनियुक्तीने पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तपदी १५ फेब्रुवारी २०२१ रोजी नियुक्ती झाली होती. ते प्रतिनियुक्तीने पाच वर्षांसाठी महाराष्ट्रात आले आहे. आता त्यांची महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मुंबई येथे बदली झाली आहे. तर सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तपदी बदली झाली आहे.
यापूर्वी ते गडचिरोली येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. शेखर सिंह हे २०१६ च्या बॅचचे अधिकारी असून देश पातळीवर त्यांनी ३०६ वा क्रमांक पटकावला होता. सिंह हे आज सायंकाळी पाच वाजता पिंपरी महापालिकेत आले. अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी आज पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला.
दरम्यान, या बदल्यांबाबतचा आदेश मंगळवारी (दि. १६) काढला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सिंह यांनी कार्यभार न स्वीकारल्याने बदली आदेश रद्द करण्यात आला असल्याची चर्चा रंगली होती. मात्र अखेर आज शेखर सिंह यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला.