नाती जोपासताना स्वार्थ बाजूला ठेवा
By Admin | Updated: March 3, 2016 01:19 IST2016-03-03T01:19:59+5:302016-03-03T01:19:59+5:30
स्वार्थी भावनेने नाती जपण्याचा प्रयत्न केल्यास नाती टिकत नाहीत. देव व भक्त, आई-मुलगा अगर मुलगी अशा अनेक निर्मळ नात्यांना एकरूपता येत नाही

नाती जोपासताना स्वार्थ बाजूला ठेवा
देहूरोड : स्वार्थी भावनेने नाती जपण्याचा प्रयत्न केल्यास नाती टिकत नाहीत. देव व भक्त, आई-मुलगा अगर मुलगी अशा अनेक निर्मळ नात्यांना एकरूपता येत नाही, असे प्रतिपादन हभप माऊलीमहाराज कदम यांनी केले.
महाशिवरात्री यात्रेनिमित्त श्रीक्षेत्र घोरवडेश्वर डोंगराच्या पायथ्याला गाथा पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याला मंगळवारी वीणा, टाळ व मृदंग पूजनाने सुरुवात झाली. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी कीर्तनात माऊलीमहाराज बोलत होते. सप्ताहात काकडारती, गाथा पारायण, महिला मंडळांचे भजन, प्रवचन, कीर्तन व हरिजागर आदी धार्मिक कार्यक्रम होत असून, पंचक्रोशीतील भाविक कार्यक्रमांचा लाभ घेत आहेत.
श्रीक्षेत्र घोरवडेश्वर विकास प्रतिष्ठान, अखंड हरिनाम सप्ताह समिती व घोरवडेश्वर प्रासादिक दिंडी आयोजित हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्याचे उद्घाटन जालना येथील कीर्तनकार हभप रामेश्वरमहाराज, हभप यतिराजमहाराज लोहर, हभप नितीनमहाराज काकडे, घोरवडेश्वर दिंडीचे अध्यक्ष हभप मुकुंदमहाराज राऊत, उद्योजक सतीश आगरवाल, चंद्रकांत मोरे यांच्या हस्ते वीणा, टाळ, कलश व मृदंगपूजन करून करण्यात आले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊसाहेब पानमंद, सप्ताह समितीचे अध्यक्ष आनंद गोपाळे, मधुकर बोडके, दत्तात्रय तरस, दत्तोपंत शेलार, बोर्डाचे सदस्य रघुवीर शेलार, विशाल खंडेलवाल, ललित बालघरे, कामगार नेते लहू शेलार आदी उपस्थित होते.
मंगळवारी दुपारी गायत्री व माऊली महिला भजनी मंडळाचे भजन झाले. सायंकाळी हरिपाठ संपन्न झाल्यानंतर रात्री नऊला हभप कदम यांचे कीर्तन झाले. कीर्तनाला गायनसाथ हभप लोहरमहाराज, काकडेमहाराज व हभप गणेशमहाराज मोहिते यांनी केली. मृदंगसाथ मृदंगाचार्य हभप विठ्ठलमहाराज गव्हाणे यांनी केली. कदम महाराजांचा सन्मान नंदकुमार काळोखे यांच्या हस्ते करण्यात आला.
हभप नानामहाराज तावरे, हभप सुभाषमहाराज गेठे, हभप आसाराममहाराज बढे, हभप नितीनमहाराज काकडे, हभप संतोषमहाराज पठारे यांची कीर्तने होणार असून, येत्या मंगळवारी हभप संतोषमहाराज शेवाळे यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार असल्याचे सप्ताह समितीचे अध्यक्ष आनंद गोपाळे यांनी सांगितले. (वार्ताहर)