Video: वरूणांचा अभिषेक, टाळ-मृदंग वाजती, वीणा झंकारती...., वैष्णवांसंगती तुकोबा निघाले पंढरी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 07:58 PM2022-06-20T19:58:04+5:302022-06-20T19:59:25+5:30

संतश्रेष्ठ जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या ३३७ पालखी सोहळ्याने आषाढी वारीसाठी श्रीश्रेत्र देहूगाव येथून पंढरीकडे सोमवारी सायंकाळी प्रस्थान ठेवले

sant tukaram maharaj palkhi ashadhi wari start today | Video: वरूणांचा अभिषेक, टाळ-मृदंग वाजती, वीणा झंकारती...., वैष्णवांसंगती तुकोबा निघाले पंढरी

Video: वरूणांचा अभिषेक, टाळ-मृदंग वाजती, वीणा झंकारती...., वैष्णवांसंगती तुकोबा निघाले पंढरी

Next

देहूगाव : कोरोना महामारीचे संकट ओसरताच अभूतपूर्व उत्साहात संतश्रेष्ठ जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या ३३७ पालखी सोहळ्याने आषाढी वारीसाठी श्रीश्रेत्र देहूगाव येथून पंढरीकडे सोमवारी सायंकाळी प्रस्थान ठेवले. ‘‘इंद्रायणीतीरी टाळ-मृदंग वाजती, वीणा झंकारती, वरूणराजाचा अभिषेक होऊनी,  तुकोबांच्या अंगणी वैष्णव नाचती.’’ अशी अपूर्व अनुभूती देहूनगरीत आली. ‘चला पंढरीशी जाऊ, रखुमादेवीवरा पाहू...अशी विठूरायाच्या भेटीची आर्तता वैष्णवांठायी दिसून आली. यंदा पावसाने ओढ दिली असली तरी आषाढी वारीस येणाऱ्या वैष्णवांचा उत्साह तसूरभरही कमी न झाल्याचे दिसून आले.
  
कोरोना महामारीचे संकट असल्याने गेली दोन वर्षे आषाढी वारीचा सोहळा हा साधेपणाने, निवडक वारकऱ्यांच्या उपस्थित साजरा केला जात होता. कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर सरकारने निर्बंध शिथिल केले आणि आषाढी वारी होणार असल्याने वारकरी वर्गात उत्साह आणि चैतन्याचे वातावरण होते.
आषाढीवारीसाठी रविवारी सांयकाळीच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिंडेकरी, दिंड्या, फडकरी, वारकरी देहूनगरीत दाखल झाले होते. त्यामुळे इंद्रायणी हरीभजन आणि भक्तीरसाने न्हाहून निघाली होती. पालखी प्रस्थान सोहळा आज असल्याने भल्या सकाळीच वारकºयांनी इंद्रायणी स्रान केले. सकाळपासूनच आज वातावरण ढगाळ होते. तर अधून-मधून पावसाच्या हलक्या सरी बसरत होत्या.

कडेकोट बंदोबस्त, मंदिर सजविले मोहक पुष्पांनी

सकाळपासूनच मुख्यमंदिरात दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. तर संपूर्ण मंदिर परिसर सुगंधी फुलांनी सजविला होता. मंदिरपरिसरात कडेकाट बंदोबस्त ठेवला होता. सकाळी आठला पाथरुडकर दिंडी व गंगा म्हसलेकर अशा म्हसलेकर मंडळींनी महाराजांच्या पादुका डोक्यावर घेऊन घोडेकर सराफ यांच्या घरी पादुकांना चकाकी देण्यासाठी नेल्या. तिथेच पाद्यपुजा अभंगारती झाली. त्यानंतर पादुका इनामदार वाड्यात आणण्यात आल्या. इनामदार वाड्यात दिलीप महाराज मोरे यांच्या हस्ते पादुकांची महापूजा झाली. त्यानंतर पालखीचे मानकरी गंगा म्हसलेकर मंडळींनी टाळ मृदंगाचा निनाद करीत मुख्यमंदिरातील वीणामंडपात आणल्या. आज  दर्शनबारीचे नियोजनही नेटके झाले होते. सकाळी दहाला काल्याचे किर्तन रामदास महाराज मोरे यांनी केले. ‘‘अनंत ब्रम्हांडे उदरी, हरी हा बालक नंदा घरी...’ हा अभंग महाराजांनी कीर्तनास निवडला होता. सूर्यनारायण डोईवर येऊ लागला तसा मुख्य मंदिरात वैष्णवांची गर्दी होऊ लागली.

नभांगणी उन सावल्यांचा, तर तुकोबांच्या अंगणी वैष्णवांनी खेळ मांडला

उन सावल्यांचा खेळ सुरू झाला. प्रस्थानाची वेळ झाल्याने तसाच मुख्यमंदिरात दिंड्या जागा घेऊ लागल्या.  आसमंती भगव्या पताका फडकावीत वैष्णवांची पावले मंदिराच्या दिशेने पडू लागली. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगळेच चैतन्य होते. अडीचच्या सुमारास प्रस्थान सोहळ्यास सुरूवात झाली. तर मंदिर आवारात मानाचे अश्व दाखल झाले तर देहूकर दिंडीने ‘ज्ञानोबा तुकाराम’ या तालावर टाळ मृदंग-कल्लोळ आणि वीणेचा झंकार करायला सुरूवात केली. दुसरीकडे वीणामंडपात महापूजा झाली. देहू संस्थानाच्या वतीने मानकºयांचा आणि दिंडेकºयांचा सन्मान केला. नभांगणी उन सावल्यांचा, तर तुकोबांच्या अंगणी वैष्णवांनी खेळ मांडल्याचे दिसून आले.

अन् वरूणांचाही अभिषेक

तर टाळमृदंगाचा कल्लोळ टीपेला पोहोचला होता. साडेतीनच्या सुमारास ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल... असा जयघोष करीत देहूतील तरूणांनी पालखी खांद्यावर घेतली. वीणा मंडपातून अपूर्व उत्साहात पालखी बाहेर पडली. त्यावेळी वरूणराजाने सोहळ्यावर हलकासा अभिषेक केला. त्यानंतर मंदिरप्रदिक्षिणा करून पालखी मुख्यमंदिरातून बाहेर आली. सोहळा पंढरीकडे मार्गस्त झाला. त्यानंतर पालखी आजोळघरी इनामदारवाड्यात विसावली. मंगळवारी सकाळी सोहळा पंढरीच्या वाटेवर मार्गस्थ होणार आहे.

Web Title: sant tukaram maharaj palkhi ashadhi wari start today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.