दोरीवरून खुनाचा छडा, कामशेत पोलिसांची कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 04:49 IST2018-01-01T04:49:43+5:302018-01-01T04:49:56+5:30
कामशेत पोलिसांनी मृताच्या गळ्यात अडकलेल्या दोरीच्या तुकड्यावरून खुनाचा छडा लावत आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

दोरीवरून खुनाचा छडा, कामशेत पोलिसांची कामगिरी
कामशेत : कामशेत पोलिसांनी मृताच्या गळ्यात अडकलेल्या दोरीच्या तुकड्यावरून खुनाचा छडा लावत आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
दहा डिसेंबरला मळवली ते कामशेत दरम्यान अप रेल्वे ट्रॅक किलोमीटर नं. १३८/१८ च्या खांबापासून २० फूट अंतरावर रेल्वेच्या धडकेत मृत्यू झालेल्या हरिश्चंद्र पांडुरंग वाघमारे (वय ३५, रा. खालापूर, रायगड; सध्या रा. बोरज, मावळ) यांचा मृतदेह लोहमार्ग पोलिसांना आढळला होता. पोलिसांनी पंचनामा केला
असता, हा खुनाचा प्रकार असल्याचे तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मयताला रेल्वे रुळावर टाकले असल्याचे निष्पन्न झाल्याने सदरील गुन्हा कामशेत पोलीस ठाण्यात वर्ग झाला होता.
या गुन्ह्याचा कोणताही पुरावा नसताना फक्त मृताच्या गळ्यात अडकलेल्या दोरीच्या तुकड्यावरून कामशेत पोलिसांनी खुनातील आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
यात कामशेत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक आय. एस. पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी
अजय दरेकर, राम कानगुडे, दत्ता शिंदे यांनी या तपास कामात अथक परिश्रम घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, २१ दिवसांपूर्वी घडलेल्या या गुन्ह्याचे कोणतेही पुरावे नसताना फक्त मृताच्या गळ्यापाशी मिळालेल्या लहान दोरीच्या साहाय्याने या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींपर्यंत पोलिसांना पोहोचता आले. मृताच्या गळ्यापाशी शेतात काम करण्यासाठी वापरण्यात येणाºया खताच्या रिकाम्या पोत्यापासून बनवलेली दोरी मिळाली. अशा प्रकारच्या दोरी वळण्याचे काम कातकरी समाज करीत असल्याने, तसेच भाताचा पेंढा व भात झोडण्यासाठी वापरली जाते हे लक्षात येताच पवन मावळ व परिसरातील कातकरी वस्त्यांमध्ये तपासास प्रारंभ केला. कोणकोणती कुटुंबे अथवा इसम गायब
असल्याचा शोध घेत असता कडधे येथील कातकरी समाजाकडून पोलिसांना किरकोळ माहिती मिळाली. त्या आधारावर व एका माहीतगार कातकरी माणसाला हाताशी घेऊन पहिला आरोपी विठ्ठल रघुनाथ वाल्हेकर (वय २७) याला जवण - मावळ येथील डोंगरवाडी येथे त्याच्या मामाकडे असताना पकडले, तर दुसरा आरोपी रघुनाथ चंदू वाल्हेकर (वय ५५) याला विसापूर किल्ल्यालगत असलेल्या धालेवाडी येथून ताब्यात घेतले.
हा तेथे अनेक दिवस लपून बसला होता. रानातील शिकारीवर आपली गुजराण करीत होता.
तिसरा आरोपी कैलास ऊर्फ काळू रघुनाथ वाल्हेकर (रघुनाथचा लहान मुलगा) हा फरार असून लवकरच त्याला अटक करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील यांनी सांगितले.
येण्या-जाण्यास मज्जाव केल्याने हत्या
मृत हरिश्चंद्र पांडुरंग वाघमारे हे कामशेत हद्दीतील एक्सप्रेस हायवेजवळ सुरू असलेल्या एका पोल्ट्री फार्म बांधकामावर रखवालीचे काम करीत होते. आरोपी रघुनाथ, विठ्ठल व कैलास हे जवळील एका शेतावर कामाला येत होते. ते डोंगरवाडी-सावंतवाडी-बोरजच्या खिंडीतून डोंगर चढून रोज पायी येत जात होते. त्यांचा रस्ता बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणातून असल्याने हरिश्चंद्र वाघमारे याने त्यांना येण्या-जाण्यास मज्जाव केला. त्यातून वादावादी झाली. त्याचाच राग मनात धरून तिन्ही आरोपींनी ठरवून संगनमताने त्याचा शेतात कामासाठी वापरण्यात येणाºया वळलेल्या दोरीच्या साहाय्याने गळा आवळून खून केला.
पुरावा नष्ट करण्यासाठी त्याला पाठकुळी घेऊन एक्सप्रेस हायवे ओलांडण्यासाठी असलेल्या मोरीतून रेल्वे रुळावर आणून टाकले. यात मृताच्या रस्त्यावर पडलेली एक चप्पल, बॅटरी यांच्या आधारे व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे खताच्या पोत्याच्या वळलेल्या दोरीमुळे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले. यामध्ये ग्रामसुरक्षा दलाच्या तरुणांच्या मदतीने कामशेत पोलिसांनी सुमारे एक आठवड्यात माग काढत दोन आरोपींना पकडून येरवडा कारागृहात त्यांची रवानगी केली.