दरोडेखोरांकडून पोलिसांवर हल्ला; स्वसंरक्षणासाठी पोलिसांकडून गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 11:28 IST2025-03-03T11:28:25+5:302025-03-03T11:28:58+5:30

पोलिस उपायुक्त शिवाजी पवार आणि उपनिरीक्षक प्रसन्न जराड जखमी

Robbers attack police police open fire in self-defense | दरोडेखोरांकडून पोलिसांवर हल्ला; स्वसंरक्षणासाठी पोलिसांकडून गोळीबार

दरोडेखोरांकडून पोलिसांवर हल्ला; स्वसंरक्षणासाठी पोलिसांकडून गोळीबार

नारायण बडगुजर

पिंपरी : खेड तालुक्यातील बहुळ गावातील दरोडा प्रकरणातील दरोडेखोरांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर संशयितांनी हल्ला केला. या हल्ल्यात पोलिस उपायुक्त डाॅ. शिवाजी पवार आणि पोलिस उपनिरीक्षक प्रसन्न जराड जखमी झाले. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी (दि. ३ मार्च) ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीत बहुळ येथे काही दिवसांपूर्वी वृद्ध दाम्पत्याच्या घरात घुसून सहा दरोडेखोरांनी चाकू आणि सुरीचा धाक दाखवत लूटमार केली होती. त्यांनी घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटून धूम ठोकली होती. या प्रकरणातील दरोडेखोर हे चिंचोशी गावात आणखी एक दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना रविवारी (दि. २ मार्च) रात्री मिळाली.  त्यानुसार, पोलिस उपायुक्त शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या दोन पथकांनी केंदूर घाटात सापळा लावला. दरोडेखोरांना पकडण्याचा प्रयत्न करताच त्यांनी पोलिसांवर थेट कोयत्याने हल्ला चढवला. यातील एका दरोडेखाने त्याच्याकडील कोयत्याने वार केले. या अचानक झालेल्या हल्ल्यात पोलिस उपायुक्त शिवाजी पवार आणि फौजदार प्रसन्न जराड जखमी झाले.

अचानक झालेल्या या हल्ल्यात स्वतःचा बचाव करण्यासाठी उपायुक्त शिवाजी पवार यांनी प्रत्युत्तरादाखल गोळी झाडली. यामध्ये एका संशयिताच्या पायाला दुखापत झाली असून, त्याला पोलिसांनी घटनास्थळीच पकडले. तसेच एक संशयित अंधाराचा फायदा घेऊन पळून जात असताना पाठलाग करून पोलिसांनी त्याला पकडले.

दरम्यान, जखमी संशयितावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच पोलिस उपायुक्त डाॅ. शिवाजी पवार आणि उपनिरीक्षक जराड यांच्यावरही उपचार करण्यात आले.   

Web Title: Robbers attack police police open fire in self-defense

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.