उड्डाणपुलाखालील वाहतूककोंडीचा प्रश्न; पदाधिकाऱ्यांपुढे अधिकाऱ्यांनी घातले लोटांगण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 04:21 IST2018-04-19T04:21:09+5:302018-04-19T04:21:09+5:30
उड्डाणपुलाखालील वाहतूककोंडीचा प्रश्न ‘जैैसे थे’; नियोजनाअभावी वाहनचालकांना त्रास

उड्डाणपुलाखालील वाहतूककोंडीचा प्रश्न; पदाधिकाऱ्यांपुढे अधिकाऱ्यांनी घातले लोटांगण
भोसरी : वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टीने भोसरीमध्ये राजमाता जिजाऊ उड्डाणपूल उभारण्यात आला. मात्र, त्याखालील अतिक्रमण आणि त्यावर कारवाईसाठी अधिकाºयांची बोटचेपी भूमिका यामुळे वाहतूककोंडी ‘जैसे थे’ आहे. येथील काही राजकीय पदाधिकाºयांच्या दबावापुढे
लोटांगण घालत या अतिक्रमणाकडे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने येथील अतिक्रमणाचा प्रश्न जटिल होत चालला आहे.
उड्डाणपुलाखाली अतिक्रमण होऊ नये, यासाठी या ठिकाणी उद्यान विकसित करण्याचे प्रस्तावित होते. उद्यानाबरोबरच वाहनतळ, तसेच पुलाच्या उताराच्या ठिकाणी हिरवळ आच्छादण्यात येणार होती. या कामासाठी स्वतंत्रपणे तरतूददेखील करण्यात आली होती.
मात्र, नियोजनाअभावी हा उड्डाणपूल सद्य:स्थितीमध्ये निरुपयोगी ठरत आहे. उड्डाणपुलाखालील जागा अक्षरश: टवाळखोरांचा अड्डा बनली आहे. दिवस-रात्र काही लोक येथे ठिय्या मांडून बसलेले असतात. फेरीवाल्यांनी उड्डाणपुलाखालील जागा म्हणजे हक्काची आणि फुकटची भाजी मंडई करून टाकली आहे.
उड्डाणपुलाच्या दुतर्फा असलेल्या दुकानांना स्वतंत्र वाहनतळाची सोय नाही. या दुकानांमध्ये येणारे ग्राहक पुलाखाली मनमानी पद्धतीने वाहन उभे करतात. फेरीवाले, दुकानदार, तसेच फळविक्रेते पुलाखालीच कचरा टाकतात. त्यामुळे या ठिकाणी मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. त्यामुळे अपघातही झाले आहेत.
भोसरीतून थेट बाहेर पडणाºयांकडून उड्डाणपुलाचा वापर होतो. त्यामध्ये खासगी वाहनांचा समावेश आहे. बसथांबा उड्डाणपुलाखाली असल्याने एस. टी., पीएमपी बसला साइड रस्त्यानेच यावे लागते. त्यामुळे उड्डाणपुलावर तुरळक वाहने दिसत असताना पुलाखाली वाहतूककोंडीचे विदारक चित्र पाहायला मिळते. तीन आसनी, सहा आसनी रिक्षा, खासगी प्रवासी वाहतूक करणाºया लक्झरी बस, मालवाहतुकीची वाहने असा सारा लवाजमा पुलाखाली जमा होत आहे. कोणतीही शिस्त न बाळगता, सर्व नियम धाब्यावर बसवून उभ्या राहणाºया वाहनांमुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे.
मद्यपींनी या ठिकाणी आपला अड्डा बनवला आहे. उड्डाणपुलाखाली पार्क केलेल्या वाहनांच्या मधील मोकळ्या जागेत मद्यपींची मैफल रंगत आहे.
रात्री-अपरात्री येथून ये-जा करणे महिलांसाठी धोकादायक बनले आहे. मात्र, महापालिका प्रशासनाकडून अतिक्रमणांवर कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. स्थानिक राजकीय पुढाºयांचे या अतिक्रमणाला पाठबळ आहे. कारवाईसाठी येणाºया अधिकाºयांना दमबाजी केली जाते. त्यामुळे याठिकाणी कारवाईला कोणीही धजावत नसल्याची चर्चा आहे.
पुलाखालील जागा व्यावसायिकांना आंदण?
राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाच्या दुतर्फा असलेल्या व्यावसायिकांनी उड्डाणपुलाखालील जागा आंदण घेतल्याच्या आविर्भावात बेकायदा वाहनतळ तयार केले आहेत. हे व्यावसायिक ठरवतील त्यांना या ठिकाणी वाहन लावण्यास मुभा आहे. इतरांना दमदाटी करण्याचे प्रकार घडत आहेत. महापालिकेने उड्डाणपुलाखालील जागा ताब्यात घेऊन ‘पे अॅण्ड पार्क’ योजना राबवावी. तसेच उड्डाणपुलाखालील जागेचे सुशोभीकरण करावे, अशी मागणी होत आहे.