पिंपरी : हिंजवडी आयटी पार्कमधील वाहतूक कोंडीची समस्या साडेविण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत शासनाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी गुरुवारी (दि. २४ जुलै) आयटी पार्कमधील रस्त्यांची पाहणी केली. यावेळी विरुद्ध दिशेने सुरू असलेल्या वाहतुकीच्या रस्त्यांवर बॅरिकेड्स लावण्यात आले. तसेच काही ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर महिनाभरासाठी वाहतूक वळवण्यात यावी, अशा सूचना करून काही उपाययोजनाही पोलिस आयुक्त चौबे यांनी सूचविल्या.सह पोलिस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आवाड, पीएमआरडीएचे अपर आयुक्त दीपक सिंगला, वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विवेक पाटील, परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड, वाकडचे सहायक पोलिस आयुक्त सुनील कुराडे, हिंजवडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे, ‘अनक्लाॅग हिंजवडी आयटी पार्क’ मोहिमेचे सचिन गुणाले, सचिन लोंढे तसेच महावितरण, पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमल) आणि एमआयडसीचे अधिकारी यावेळी उपस्थित होता.पोलिस आयुक्त चौबे आणि अधिकाऱ्यांनी आयटी पार्कमधील काही ठिकाणांची पाहणी करून उपाययोजना सुचवल्या. सातत्याने कोंडी होणाऱ्या रस्त्यांवर तसेच चौकांतील वाहतूक वळविण्यात यावी, काही ठिकाणी एकेरी वाहतूक करण्यात यावी. महिनाभर प्रायोगिक तत्त्वावर हे वाहतूक बदल करण्यात यावेत, अशा सूचना आयुक्त चौबे यांनी केल्या.हिंजवडी वाहतूक विभागाच्या कार्यालयापासून पाहणी केली. तेथील पुलाच्या सेवारस्त्यालगत असलेली महावितरण कंपनीचे रोहित्र (डीपी) हटविण्याबाबत सूचना केली. त्यामुळे सेवा रस्त्यावरील फ्री लेफ्ट अधिक सोयीचा होईल. जांभूळकर चौक, इंडियन आयल पेट्रोल पंप चौकातील सर्कल अर्धे करावे. शेल पेट्रोल पंप चौकातील विरुद्ध दिशेने येणारी वाहतूक बंद केली. माइंड ट्री कन्सल्टिंग चौक येथे वाहतूक उपाययोजनांचा आढावा घेतला.क्रोमा चौक येथे मेट्रो स्टेशनच्या जिन्यामुळे आठ मीटर रस्ता व्यापला जात होता. जिन्याची रुंदी कमी केली. त्यामुळे रस्त्यावर एक लेन वाहतुकीसाठी उपलब्ध झाली. विप्रो सर्कल येथे ‘फ्री लेफ्ट’ सुरू केला. तसेच रस्ता दुरुस्ती करून वाहतुकीत बदला केला. डाॅलर कंपनीजवळील नाल्यावरील अतिक्रमण हटवण्याची सूचना केली. एमआयडीसी सर्कल येथे विरुद्ध दिशेने जाणारी वाहने थांबवण्यासाठी बॅरिकेडस लावले. मेगा पोलिस सर्कल येथे बससाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची सूचना केली. माण रस्त्यावरील फेज एकवरील पांडवनगरमधील काढलेल्या अतिक्रमणाची पाहणी केली. तेथील उर्वरित एक अतिक्रमण हटविण्याच्या सूचना केल्या.उपाययोजनांबाबत ५७ पानी अहवाल...अनक्लाॅग हिंजवडी आयटी पार्क मोहिमेंतर्गत वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सह्यांची मोहीम राबविली. तसेच उपाययोजना सूचविल्या आहेत. त्याचा ५७ पानी अहवाल हिंजवडी पोलिस ठाण्यात पोलिस आयुक्त चौबे यांना देण्यात आला. कोणत्या ठिकाणी काय उपाययोजना कराव्यात याबाबतचे जिओ टॅगिंग केले आहे. त्यामुळे तीन ते चार महिन्यांत वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल, असे या अहवालात नमूद केले आहे, असे सचिन लोंढे यांनी सांगितले.
बॅरिकेड्स, मनुष्यबळ आणि कायमस्वरुपी तसेच पोर्टेबल सिग्नल उपलब्ध होण्याबाबत पोलिस आयुक्त आणि इतर विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली. वाहतूक सुरळीत होण्याबाबतच्या नियोजनाला प्राधान्य देण्यात येत आहे. - सचिन लोंढे, ‘अनक्लाॅग हिंजवडी आयटी पार्क’ मोहीम