पिंपळे गुरव : प्रवाशाची रिक्षात सापडलेली एक तोळे सोन्याची अंगठी परत देऊन पिंपळे गुरव येथील रिक्षाचालक रवींद्र देवकुळे यांनी प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले. श्रेयस पुरोहित हे ऑनलाइन पद्धतीने ऑटो बुक करून रिक्षाचालक देवकुळे यांच्या रिक्षातून दापोडी ते बावधन असा प्रवास करत होते. ते रिक्षातून उतरले, तेव्हा घाईत त्यांची एक तोळे सोन्याची अंगठी रिक्षात पडली. हे काही वेळाने त्यांच्या लक्षात आले. त्यांनी संबंधित कंपनीला संपर्क साधून रिक्षाचालक देवकुळे यांचा मोबाइल नंबर घेऊन त्यांना फोन केला.
अंगठी सापडली आहे का, याबाबत विचारणा केली. देवकुळे यांनी अंगठी सापडल्याचे सांगितले व सामाजिक कार्यकर्ते सुरेश सकट यांच्या सहकार्याने सांगवी पोलिस ठाण्यात जाऊन पुरोहित यांना ती परत दिली. या प्रामाणिकपणाबद्दल पुरोहित यांनी त्यांचे आभार मानले. पोलिस अधिकाऱ्यांनी रिक्षाचालक देवकुळे यांचा सत्कार केला.
पुरोहित यांना ठरलेल्या ठिकाणी सोडल्यानंतर दुसरे एक भाडे घेत असताना रिक्षात अंगठी सापडली. सांगवी पोलिसांच्या साक्षीने ती संबंधित प्रवाशास सुपूर्द केली. रिक्षात सापडलेले दागिने परत देऊन कर्तव्य पार पाडले. त्या प्रवाशास दिलासा देता आला, याचे समाधान आहे. - रवींद्र देवकुळे, रिक्षाचालक, पिंपळे गुरव