पिंपरी : ऑनलाइन फूड डिलिव्हरीसाठी फेक आयडी वापरल्याचा जाब विचारल्यामुळे एका डिलिव्हरी बॉयवर त्याचे तिघे सहकारी डिलिव्हरी बॉय यांनी हल्ला केला. ही घटना मंगळवारी (दि. १६ सप्टेंबर) पिंपळे गुरव येथे घडली.
या प्रकरणी मंगेश रमेश मुंडेवाड (२०, पिंपळे सौदागर) याने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हर्षद खरबान, त्याचा भाऊ आणि इतर मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ऑर्डर घेण्यासाठी थांबला असताना संशयिताचा भाऊ फेक आयडी वापरून ऑर्डर देत होता. त्याचा जाब विचारल्यामुळे संशयितांनी त्यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. संशयिताने हातातील लोखंडी कडे फिर्यादीच्या डोक्यात मारून त्याला जखमी केले. तसेच फिर्यादीचे मित्र अमित गुप्ता आणि सचिन जाधव यांनाही मारहाण केली.