पाणी योजनेस प्राधान्य

By admin | Published: May 31, 2017 02:05 AM2017-05-31T02:05:26+5:302017-05-31T02:05:26+5:30

शहराचा वाढता विस्तार पाहाता ७३ कोटींची भुयारी गटार योजना आणि ६४ कोटींची नवीन इंद्रायणी पाणीपुरवठा योजना

Priority of water planning | पाणी योजनेस प्राधान्य

पाणी योजनेस प्राधान्य

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव दाभाडे : शहराचा वाढता विस्तार पाहाता ७३ कोटींची भुयारी गटार योजना आणि ६४ कोटींची नवीन इंद्रायणी पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास जाईपर्यंत इतर कोणत्याही मोठ्या खर्चाच्या योजनेवर खर्च न करण्याचा ठराव नगर परिषदेच्या सोमवारी झालेल्या सर्वसाधारण  सभेत बहुमताने मंजूर करण्यात  आला. नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत पटलावर ८० विषय होते. उपनगराध्यक्ष सुनील शेळके, मुख्याधिकारी वैभव आवारे व्यासपीठावर उपस्थित होते.
सत्ताधारी पक्षातर्फे शेळके यांनी विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरविण्याची गरज असल्याचा विषय मांडताना भुयारी गटार योजना आणि नवीन पाणीपुरवठा योजना प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी विषय मांडला. येत्या डिसेंबरअखेर दोन्ही महत्त्वाकांक्षी योजना पूर्णत्वास नेण्यासाठी शहरातील डीपी रस्त्यांच्या मोठ्या खर्चाच्या कामांना फाटा देण्याबाबचा ठराव मंजूर करण्यात आला.
बांधकाम विभागांतर्गत २३ विषयांमधे पाण्याची टाकी, उद्यान सीमा भिंत, रस्ते दुरुस्ती, सांडपाणी निचरा, स्पीड ब्रेकर्स, ज्येष्ठ नागरिकांसाठी वतननगरात सभागृह, व्यायामशाळा तसेच कडोलकर कॉलनीत बेटी बचावो-बेटी पढाओ शिल्प, घोरावाडी रेल्वे रस्त्याचे रुंदीकरण, ढोरवाड्यातील समाज मंदिर दुरुस्ती आदी विषयांना मंजुरी देण्यात आली.
उद्यान विभागाच्या १४ विषयांना मंजुरी देण्यात आली. त्यात महिलांसाठी जीम, सुशोभीकरण, विद्युत कामांचा समावेश आहे. विद्युत विभागातील २६ विषयांनाही मंजुरी देण्यात आली.
आरोग्य विभागांतर्गत मोरखळा कचरा डेपोतील कचऱ्याचे निर्मूलन करणे, स्टेशन आणि गाव भागात पेट बॉटल क्रशिंग मशिन लावणे आणि रोटरी क्लब सिटीसाठी पाच स्वच्छतागृहांसाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या ठरावास एकमताने मंजुरी देण्यात आली.
सभागृह नेते सुशील सैंदाणे, विरोधी पक्ष नेत्या हेमलता खळदे, ज्येष्ठ नगरसेविका सुलोचनाताई आवारे, अरुण माने, संतोष भेगडे, अरुण भेगडे, संदीप शेळके, सचिन टकले, शोभा भेगडे, नीता काळोखे, मंगल भेगडे, संध्या भेगडे, अमोल शेटे, विभावरी दाभाडे, वैशाली दाभाडे, कल्पना भोपळे आदींनी चर्चेत सहभाग घेतला.

नगररचना : मैला शुद्धीकरण प्रकल्पासाठी आरक्षण

नगररचना विभागातील विषयात यशवंतनगरातील गोल मैदानास
एक्रिलीक कमान करून त्यावर गोळवलकर गुरुजी असे नाव देण्याचा
निर्णय घेण्यात आला. मैला शुद्धीकरण प्रकल्पासाठी विठ्ठल मंदिर संस्थानाची सर्व्हे नं. ६५ वरील तीन एकर जागा आरक्षित करण्याचा विषय पुढील कौन्सिल सभेच्या निर्णयासाठी सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. नगर परिषद कार्यालयाच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत चर्चा झाली.

Web Title: Priority of water planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.