Video: पुजारी समाधीवर ठेवलेले पैसे गुपचूप खिशात घालायचा; आळंदी देवस्थानाने केली दोघांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 22:28 IST2025-04-02T22:26:20+5:302025-04-02T22:28:30+5:30
गर्दीच्या वेळी कर्मचारी भाविकांकडून दर्शनासाठी पैसे घेत असल्याच्या तक्रारी होत्या. तर पुजारी समाधीवर ठेवलेले पैसे खिशात घालतात असेही काही प्रसंग यापूर्वी सीसीटीव्हीमध्ये कैद झालेले आहेत.

Video: पुजारी समाधीवर ठेवलेले पैसे गुपचूप खिशात घालायचा; आळंदी देवस्थानाने केली दोघांवर कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीच्या संत ज्ञानेश्वर माउलींच्या समाधी मंदिरातील शिपाई व पुजारी यांच्यावर गैरवर्तन प्रकरणी आळंदी देवस्थानच्या व्यवस्थापनाने माफीनामा लिहून घेत संबंधितांना घरचा रस्ता दाखविला आहे. आळंदी देवस्थानचे कर्मचारी आणि पुजारी नेहमीच चर्चेचा विषय ठरत आहेत. गर्दीच्या वेळी कर्मचारी भाविकांकडून दर्शनासाठी पैसे घेत असल्याच्या तक्रारी होत्या. तर पुजारी समाधीवर ठेवलेले पैसे खिशात घालतात असेही काही प्रसंग यापूर्वी सीसीटीव्हीमध्ये कैद झालेले आहेत. मात्र, समज देऊन हलकीफुलकी कारवाई करून त्यांना सोडले जात होते.
दोन दिवसांपूर्वी एक कर्मचारी रात्री साडेदहाच्या सुमारास मद्यप्राशन करून हातात टोकदार वस्तू घेऊन मंदिरात आला. कार्यालयातील एकाला तो दमदाटी करत होता. तसेच, उलटसुलट बोलत होता. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यास व्यवस्थापनाने तंबी देऊन घरी बसवले. अन्य दुसऱ्या घटनेत मागील तीन आठवड्यांपूर्वी एक पुजारी माउलींच्या समाधीसमोर बसलेला असताना भाविकाने समाधीवर ठेवलेले पैसे दानपेटीत न टाकता खिशात ठेवत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये निदर्शनास आले होते. संबंधित पुजाऱ्याकडून देवस्थानने माफीनामा लिहून घेतला आहे.
शिपाई पुरुषोत्तम डहाके यांनी मद्यप्राशन करून मंदिरात गैरवर्तन केल्याची तक्रार आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली आहे. पुजारी यशोदीप जोशी यांच्याकडून झाल्या प्रकाराबाबत माफीनामा लिहून घेतला असल्याचे देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी सांगितले.
संत ज्ञानेश्वरांच्या समाधीवर भाविकाने ठेवलेले पैसे पुजाऱ्याने घातले खिशात, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद #Pune#alandi#santdnyaneshwar#pujaripic.twitter.com/I20qzBeWWC
— Lokmat (@lokmat) April 2, 2025
“देवस्थानच्या व्यवस्थापकांनी दोन्ही घटनांची माहिती दिली. याबाबत संबंधित मद्यप्राशन केलेला शिपाई आणि समाधीवरील पैसे खिशात घालणारा पुजारी यांना सर्व विश्वस्तांशी चर्चा करून निलंबित केले जाईल. अन्य कोणी असे प्रकार करू नयेत, यासाठी ही कारवाई लवकरच केली जाईल. यापूर्वीही मद्यप्राशन करून कामावर आलेल्या दोघा कर्मचाऱ्यांना मागील वर्षी कायमस्वरूपी घरी बसवले आहे.
- योगी निरंजननाथ, प्रमुख विश्वस्त