आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार

By Admin | Updated: July 8, 2016 03:55 IST2016-07-08T03:55:17+5:302016-07-08T03:55:17+5:30

पावसाळा सुरू झाल्याने आपत्ती व्यवस्थापन कक्ष सज्ज असून, पूरस्थिती आणि पूरनियंत्रणासाठीच्या उपाययोजन केल्या असून, त्यासाठीचे कक्ष एक जूनपासून कार्यरत आहेत.

Prepare Disaster Management Plan | आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार

आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार

पिंपरी : पावसाळा सुरू झाल्याने आपत्ती व्यवस्थापन कक्ष सज्ज असून, पूरस्थिती आणि पूरनियंत्रणासाठीच्या उपाययोजन केल्या असून, त्यासाठीचे कक्ष एक जूनपासून कार्यरत आहेत. सहाही प्रभागांत याविषयीचा कक्ष सुरू आहे. पूरस्थितीसंदर्भात नदीकाठच्या नागरिकांना वेळोवेळी सूचना केल्या जातील, असे सांगत होत्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या सहायक आयुक्त आशादेवी दुर्गुडे.

महापालिकेने केलेल्या आपत्ती व्यवस्थापनाविषयी सांगा.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने पूरनियंत्रणासाठी आराखडा तयार केला आहे. त्याविषयीची बैठक मे महिन्यात झाली होती. त्यासाठी प्रभाग अधिकारी, स्थापत्य विभाग, अग्निशमन, वैद्यकीय, पाणीपुरवठा, पर्यावरण विभागाचे अधिकारी यांची बैठक घेऊन आपत्ती व्यवस्थापनाबाबत सूचना केल्या आहेत. जून ते सप्टेंबर या तीन महिन्यांसाठी पूरनियंत्रण कंट्रोल रूम तयार केली आहे. त्या संदर्भात कक्षाचे दूरध्वनी क्रमांकही देण्यात आले आहेत.

पूरनियंत्रण कृतिआराखडा काय आहे?
आपल्या शहरातून पवना, मुळा, इंद्रायणी या तीन नद्या जातात. पूरस्थिती निर्माण होऊ नये किंवा निर्माण झाल्यास कोणत्या उपाययोजना कराव्यात, यासाठी कृतिआराखडा तयार केला होता. त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. त्यामुळे नदीकाठच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सूचना देण्यात येतात. ब, क, ड या प्रभागाच्या परिसरातून नद्या वाहतात. त्या नद्यांच्या परिसरातील नाल्यांची सफाई करणे, तसेच बॅक वॉटरमुळे किंवा पुरामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरू नये, याविषयीच्या सूचना दिलेल्या आहेत. तसेच अग्निशमन विभागही सेवेसाठी सज्ज आहे. या आराखड्यात विविध विभागांचे अधिकारी, त्यांची जबाबदारी आणि त्यांनी करावयाच्या उपाययोजना यांबाबत सूचना केलेल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडे काढणे, संक्रमण शिबिर इमारतीचा परिसर स्वच्छ ठेवणे, नदीकाठावर फ्लड लाइटची व्यवस्था करणे आदींबाबत आयुक्तांनी केलेल्या सूचनांनुसार काम पूर्ण झालेले आहे. संभाव्य पुराचा धोका ओळखून नियोजन केले आहे.

पूरस्थितीविषयीची मार्गदर्शक तत्त्वे काय?
पूरस्थितीविषयी राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने नदीतील पाण्याची पातळी ठरवून दिलेली आहे. पाच हजार ते दहा हजार क्युसेक पाणी ही सामान्य पातळी असून, २० हजार क्युसेक नदीत पाणी आले, तर अलर्ट लेव्हल मानली जाते. त्यापेक्षा ३५ किंवा ५५ क्युसेक पाण्याची पातळी वाढली. धोकादायक परिस्थिती मानली जाते. नदीपात्रालगत असणाऱ्या झोपड्यांच्या परिसरात पाणी शिरण्यापूर्वी तेथील नागरिकांना स्थलांतरित करून सुरक्षित ठिकाणी त्यांची व्यवस्था केली जाते. यासाठी पूरनियंत्रण कक्ष कार्यरत झाला आहे.

नागरिकांनी दक्षता कोणती घ्यावी?
आपल्या शहरातून तीन नद्या जातात. पवना नदीवर पवनानगर येथे धरण आहे. तसेच इंद्रायणी आणि मुळा नदीवरही धरणे आहेत. पावसाचे प्रमाण अधिक राहिल्यास जलसंपदा विभागाकडून महापालिकेच्या पूरनियंत्रण कक्षाला सूचना दिल्या जातात. धरणात वाढणारे पाणी याबाबतची माहिती रोजच्या रोज कळविली जाते. धरणातून पाणी सोडण्यापूर्वी किमान तीन तास अगोदर सूचना दिल्या जातात. अशा प्रकारच्या सूचना आल्या की, नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना सूचना दिल्या जातात. वेळप्रसंगी रिक्षाद्वारे ध्वनिवर्धकावरून माहिती पुरविली जाते. पूरनियंत्रणासाठी कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. पूरस्थितीबाबत नागरिकांनी जागरूक राहून मिळणारी माहिती महापालिकेपर्यंत पोहोचवावी.

Web Title: Prepare Disaster Management Plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.