आमची सूत्र येरवडा जेलमधून हलतात.. ; सोशल मीडियावरील स्वयंघोषित ‘भाई’ला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 21:02 IST2021-07-14T21:02:08+5:302021-07-14T21:02:48+5:30
आरोपीने हातात कोयते घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या दोन पोस्ट त्याने सोशल मीडियावर टाकल्या होत्या.

आमची सूत्र येरवडा जेलमधून हलतात.. ; सोशल मीडियावरील स्वयंघोषित ‘भाई’ला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पिंपरी : आमची सूत्रे येरवडा जेलमधून हलतात, असे सांगून हातात कोयते घेऊन सोशल मीडियावर दहशत निर्माण करणाऱ्या स्वयंघोषित भाईला जेरबंद करण्यात आले. पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने बुधवारी (दि. १४) ही कारवाई केली.
मयूर अनिल सरोदे ऊर्फ यमभाई (वय २१, रा. दुर्गानगर, निगडी-भोसरी रोड, आकुर्डी), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंभीर दुखापत करण्याचा गुन्हा यापूर्वी आरोपीच्या विरोधात दाखल आहे. हातात कोयते घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या दोन पोस्ट त्याने सोशल मीडियावर टाकल्या होत्या. आमची सूत्र येरवडा जेलमधून हालतात, असे सांगत थेट पोलिसांनाच आव्हान देणारी तिसरी पोस्ट त्याने केली. याबाबत गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने यांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.