निवडणूक बंदोबस्त टाळण्यासाठी खोटे कारण दिल्याने पोलिस निलंबित

By नारायण बडगुजर | Published: April 18, 2024 09:38 PM2024-04-18T21:38:27+5:302024-04-18T21:38:45+5:30

गडचिरोली येथे जाण्याचे दिले होते आदेश

Police suspended for giving false pretext to avoid election duty | निवडणूक बंदोबस्त टाळण्यासाठी खोटे कारण दिल्याने पोलिस निलंबित

निवडणूक बंदोबस्त टाळण्यासाठी खोटे कारण दिल्याने पोलिस निलंबित

लोकमत न्यूज नेटवर्क

पिंपरी : लोकसभा निवडणूक बंदोबस्तासाठी गडचिरोली येथे जाण्याबाबत वरिष्ठांनी आदेश दिले. मात्र, आदेशाकडे दुर्लक्ष करून पोलिस अंमलदाराने आजारी असल्याचे खोटे कारण सांगितले. त्यामुळे संबंधित पोलिस अंमलदाराला तडकाफडकी निलंबित केले. पिंपरी-चिंचवडचे अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी यांनी बुधवारी (दि. १७) याबाबतचे आदेश दिले. 

भूषण अनिल चिंचोलीकर (नेमणूक, मुख्यालय, पिंपरी- चिंचवड), असे निलंबित केलेल्या पोलिस शिपायाचे नाव आहे. राज्याचे पोलिस महासंचालक यांच्या कार्यालयीन आदेशानुसार, १२ ते २१ एप्रिल २०२४ या कालावधीत लोकसभा निवडणूक बंदोबस्तासाठी गडचिरोली येथे जाण्यासाठी पिंपरी - चिंचवड पोलिस आयुक्तालयातील ५० कर्मचार्‍यांच्या नेमणुकीबाबत आदेश प्राप्त झाले. त्या अनुषंगाने आयुक्तालयांतर्गत कार्यरत असलेल्या ५० कर्मचार्‍यांची बंदोबस्तासाठी नेमणूक झाली. त्यामध्ये चिंचोलीकर यांचाही समावेश होता. दरम्यान, बंदोबस्तासाठी नेमलेल्या कर्मचार्‍यांची १० एप्रिल रोजी निगडी येथे पोलिस मुख्यालयात हजेरी घेण्यात आली. त्यावेळी चिंचोलीकर गैरहजर होते. आजारी असल्याचे त्यांनी फोनवरून मुख्यालयास कळविले.  

भूषण चिंचोलीकर यांच्या आजारपणाबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय काळे यांच्याकडे चौकशी झाली. चिंचोलीकर हे जुलाब, उलटी, ताप, पोटदुखीचा त्रास होत असल्याने औषधोपचारासाठी आपल्याकडे वैद्यकीय तपासणीसाठी आले होते, असे डाॅ. काळे यांनी सांगितले. त्यांना रुग्णालयात दाखल होऊन तपासण्या करण्यास सांगितले. मात्र, चिंचोलीकर यांनी कोणत्याही तपासण्या केल्या नाहीत. चिंचोलीकर यांना होत असलेला त्रास हा गंभीर स्वरूपाचा नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

अतिमहत्त्वाच्या बंदोबस्तासाठी नेमणूक केलेली असतानाही आजारी असल्याबाबत खोटे कारण सांगून बंदोबस्त चुकविण्यासाठी चिंचोलीकर गैरहजर राहिले. वरिष्ठांच्या आदेशाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून आदेशाची अवहेलना केली. तसेच, कर्तव्यात गंभीर स्वरूपाची कसुरी केली. त्यांचे हे वर्तन बेशिस्त, बेजबाबदार व निष्काळजीपणाचे असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांचे निलबंन केले.

Web Title: Police suspended for giving false pretext to avoid election duty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.