चिंचवडमध्ये पीएमपीने अचानक घेतला पेट; ‘देवदूत’ दाखल झाल्याने टळली दुर्घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 15:05 IST2017-12-06T15:01:30+5:302017-12-06T15:05:01+5:30
चिंचवड गावात कै. शाहिद अशोक कामठे बस स्थानक परिसरात उभ्या असणाऱ्या बसने अचानक पेट घेतला. अग्निशामक दलाच्या दोन गाड्यानी त्वरीत आग आटोक्यात आणली.

चिंचवडमध्ये पीएमपीने अचानक घेतला पेट; ‘देवदूत’ दाखल झाल्याने टळली दुर्घटना
चिंचवड : चिंचवड गावात कै. शाहिद अशोक कामठे बस स्थानक परिसरात उभ्या असणाऱ्या बसने (एम एच १२ एच बी ४०१) अचानक पेट घेतला. अग्निशामक दलाच्या दोन गाड्यानी त्वरीत आग आटोक्यात आणली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दुपारी दीड दरम्यान ही घटना घडली.
चिंचवडहून चांदखेडला जाणारी बस रस्त्याच्या बाजूला उभी होती. अचानक या गाडीतून धूर येऊ लागल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. यावेळी बस चालक दादासाहेब थोरात यांनी प्रसंगावधान दाखवत गाडीकडे धाव घेऊन गाडीतील बॅटरीच्या वायर काढल्या व गॅसचा प्रवाह बंद केला. काही क्षणातच येथे अग्निशामक दालाची 'देवदूत' दाखल झाल्याने मोठी दुर्घटना टळली.
घटना स्थळावर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. चिंचवड पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन येथील परिस्थिती नियंत्रणात आणली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. पिंपरीतील नेहरूनगर आगारातील ही गाडी होती. चांदखेड वरून गाडी चिंचवड स्थानकात आल्यानंतर पाचच मिनिटांत हा प्रकार घडला. सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी खाली उतरले होते. या घटनेत बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही काळ या भागातील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. इतर मार्गावर जाणाऱ्या बससेही काही काळ थांबविण्यात आल्या होत्या.