पिंपरीकरांनो रुग्णवाहिका चालक जास्त भाडे आकारताय, बिनधास्त तक्रार करा; आरटीओ करणार कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 21:27 IST2021-04-22T21:21:59+5:302021-04-22T21:27:50+5:30
आरटीओच्या वायुवेग पथकाचा असणार ‘वॉच’

पिंपरीकरांनो रुग्णवाहिका चालक जास्त भाडे आकारताय, बिनधास्त तक्रार करा; आरटीओ करणार कारवाई
पिंपरी : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णवाहिका चालक जास्तीचे भाडे आकारत असल्याच्या तक्रारी रुग्णांच्या नातेवाईकांकडून होत आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून रुग्णवाहिकांचे भाडे दरपत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार भाडे आकारणी न करता जास्तीचे पैसे घेतल्यास कारवाईचा इशारा ‘आरटीओ’कडून देण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात दररोज अडीच हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. तसेच मृतांच्या संख्येत भर पडत आहे. त्यामुळे स्मशानभूमीतही ‘वेटींग’ आहे. रुग्णालयात बेड मिळत नसल्याने रुग्णवाहिकेतच रुग्णांवर उपचार करावे लागत आहेत. तसेच स्मशानभूमीतही तासन्तास रुग्णवाहिका थांबून असतात. याचा गैरफायदा घेऊन काही रुग्णवाहिकावाले जास्तीच्या पैशांची मागणी करीत असल्याचे प्रकार समोर येत आहेत.
शहरातील काही रुग्णालयांकडे स्वत:च्या रुग्णवाहिका आहेत. त्या रुग्णालयांना तसेच रुग्णवाहिकांचे मालक व चालक यांना ‘आररटीओ’कडून पत्र देण्यात आले आहेत. प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, पुणे यांच्यातर्फे १४ मे २०२० रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णवाहिकांचे सुधारित दर निश्चित केले होते. त्यानुसार भाडे आकारणी करण्याच्या सूचना या पत्रातून दिल्या आहेत. ठरवून दिलेल्या भाड्यापेक्षा जास्त पैशांची मागणी करणा-या रुग्णवाहिका चालकांच्या विरोधात नागरिकांनी mh14@mahatranscom.in या ई-मेल आयडीवर तक्रारी कराव्यात, असे आवाहन पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात आले आहे. अशा तक्रारींची दखल घेऊन वायुवेग पथकाकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
रुग्णवाहिकांना जीपीएस असावे, त्यांचे निर्जंतुकीकरण करावे, दरपत्रक रुग्णवाहिकेच्या आतील बाजीस दिसेल अशा पद्धतीने लावावे. हे भाडे संपूर्ण जिल्ह्यासाठी लागू राहणार आहे. रुग्णवाहिकेच्या निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्तीचे भाडे आकारणी करू नये. अन्यथा कारवाई करण्यात येईल.
- अतुल आदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड
रुग्णवाहिका प्रकार – दर २५ किमी अथवा दोन तास – दर प्रति किमीसाठी – दर प्रतीक्षा प्रति तास
१) मारुती – ५०० रु. – ११ रु. – १०० रु.
२) टाटा सुमो, मेटाडोर इत्यादी सदृष्य कंपनीने बांधणी केलेली रुग्णवाहिका – ६०० रु. – १२ रु. – १२५ रु.
३) टाटा ४०७, स्वराज माझदा इत्यादी सदृष्य कंपनीने बांधणी केलेली रुग्णवाहिका – ९०० रु. – १३ रु. – १५० रु.