Pimpri Chinchwad : अनधिकृत नऊ रुफटाॅप हॉटेलवर पिंपरी महापालिकेचा हातोडा
By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: October 12, 2023 20:05 IST2023-10-12T20:05:00+5:302023-10-12T20:05:07+5:30
‘रुफटॉप’ हॉटेलची संकल्पनाच नसल्याचे स्पष्टीकरण

Pimpri Chinchwad : अनधिकृत नऊ रुफटाॅप हॉटेलवर पिंपरी महापालिकेचा हातोडा
पिंपरी : शहरातील रुफटॉप हॉटेल्स महापालिकेच्या रडारवर आहेत. काहीच हॉटेल्सकडे योग्य ते परवाने असल्याचे समोर आले आहे. शहरात महापालिकेने सर्वेक्षण केले असून, त्यात ४९ रुफटॉप हॉटेल्स आढळली होती. त्यापैकी नऊ हॉटेलवर हातोडा घालण्याची कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती सहायक आयुक्त विजयकुमार सरनाईक यांनी दिली.
महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी नुकतीच अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यात ‘रुफटॉप हॉटेल’सह, आजूबाजूला उभ्या राहिलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा आणि दिवसांत अहवाल सादर करा, असे आदेश आयुक्तांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार क्षेत्रीय कार्यालयाने कार्यवाही सुरू केली आहे. त्यात थेरगाव, वाकड, पिंपळे सौदागर, विशालनगर, रहाटणी आदी भागातील रुफटॉप हॉटेलवर कारवाई करत ते जमीनदोस्त करण्यात आले आहेत.
रुफटॉप बेकायदाच
एकात्मिक बांधकाम नियंत्रण नियमावलीत ‘रुफटॉप’ हॉटेल अशी संकल्पनाच नसल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. महापालिकेकडून आतापर्यंत अशा कुठल्याही हॉटेलला परवानगी दिलेली नाही. बऱ्याच वेळा टेरेसवर काही प्रमाणात अधिकृत बांधकाम असलेल्या जागेत ‘रेस्टॉरंट’ची परवानगी घेण्यात येते आणि या बांधकामालगत असलेल्या टेरेसवर बेकायदा हॉटेल थाटले जाते. शहरातील काही ‘रुफटॉप’ हॉटेलला अशा प्रकारे परवानगी आहे. मात्र, काही ठिकाणची हॉटेल पूर्ण बेकायदा आहेत. परवानगी असलेले त्याआधारे मद्यविक्रीचा परवाना मिळवतात आणि संपूर्ण टेरेस काबीज करून मोठे हॉटेल थाटतात.
‘रुफटॉप हॉटेल’मधील धोके
- अग्निशमन यंत्रणेचा अभाव.
- लिफ्ट नसणे किंवा एकच लिफ्ट असणे.
- आपत्कालीन स्थितीत बाहेर पडण्यास एकच मार्ग.
- स्वच्छतागृहाची अपुरी सुविधा.
''बांधकाम विभागातर्फे बेकायदा ‘रुफटॉप हॉटेल’चे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. त्याविरोधात कारवाई केली जात आहे. कारवाई केलेल्या ठिकाणी पुन्हा हॉटेल सुरू झाले तर त्यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला जाईल.- विजयकुमार सरनाईक, सहायक आयुक्त, महापालिका''